सुकमामध्ये चकमकीत १८ नक्षलवादी ठार   

चार जवान जखमी; शोधमोहीम सुरु
 
सुकमा : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले. यात ११ महिला नक्षलवादींचा समावेश आहे. तर, चार जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तर विभागाचे महासंचालक सुंदरराज पी. यांनी दिली.
 
केरळपाल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जंगलात काल सकाळी आठ वाजता ही चकमक झाली. जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक उडाली. मृत नक्षलवाद्यांमध्ये एकावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर होते. केरळपाल परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री शोधमोहीम हाती घेतली होती. चहुबाजूने वेढल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत १८ नक्षलवादी ठार झाले. तर, डीआरजीचे तीन आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  घटनास्थळावर १८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्याखेरीज, एके-४७ रायफल, स्वयंचलित रायफल, स्फोटके आणि अन्य काही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या परिसरात शोधमोहीम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत सात मृत नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. इतर नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ते कोणत्या संघटनेचे सदस्य होते, हेही पोलिस पाहात आहेत. 
 
कुहदामी जगदीश उर्फ बुध्रा या मृत नक्षलवाद्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर होते. तो अनेक कारवायांमध्ये पोलिसांना हवा होता. २०१३ मध्ये एक काँग्रेस नेत्याच्या हत्येतही त्याचा समावेश होता. मागील आठवड्यात विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात दोन विविध चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले होते.   या वर्षी आतापर्यंत राज्यात विविध चकमकीत १३२ नक्षलवादी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत ठार झाले आहेत. बस्तर विभागात सात नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा समावेश आहे. सुकमा जिल्ह्यात यावर्षी विविध चकमकीत २२ नक्षलवादी ठार झाले. पुढील वर्षी भारत नक्षलमुक्त झालेला असेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
 

Related Articles