E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
नवसर्जनाचे स्वागत करु या...
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
पाडवा विशेष : डॉ. तारा भवाळकर
ज्येष्ठ साहित्यिक
९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष
एकीकडे संहारकतेचे युग येऊ घातलेले असताना तरुण मुलामुलींच्या मनात त्या संहाराची जागा निर्मितीने, विधायक आनंदाने घ्यावी असे वाटते. समाजातील धुरिणांनी, विचारवंतांनी, कलाक्षेत्रातील लोकांनी सर्व उत्सव विधायकतेकडे न्यावेत, ही अपेक्षा आपण नव्या युगामध्ये करु शकतो, कारण नव्या युगाला त्याचीच जास्त गरज आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त आपण हा विचार प्रबळ करायला हवा.
भारतात साजरे होणारे सगळे सण-उत्सव निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. किंबहुना, प्राचीन काळापासून जगाच्या पाठीवरील सगळ्याच संस्कृतींमध्ये आणि भारतातही प्रामुख्याने निसर्गचक्र बदलण्याच्या सुमारास एखादा सण असतो. जगामध्ये दोन प्रकारची कालगणना पद्धती बघायला मिळते. एक चांद्रमासाप्रमाणे म्हणजेच चंद्राच्या कलेच्या गतीप्रमाणे होणारी गणना तर दुसरी सूर्यगतीप्रमाणे होणारी गणना. आपल्याकडे या दोन्हींचे संमिश्रण झाले आहे. म्हणजेच आपण महिना अमावस्या, दोन पक्ष अशा प्रकारे चांद्रमासाप्रमाणे मोजतो तर वर्ष सौरमासाप्रमाणे मोजतो. मात्र व्यवहारात आपण पाश्चिमात्यांचे पंचाग वापरतो. पण चांद्रमास आणि सौरवर्षामध्ये चार आठवड्याचा एक महिना, अशी गणना असली तरी प्रत्यक्षात पाश्चिमात्य पंचांगाप्रमाणे तो कधी २८, कधी ३० तर कधी ३१ दिवसांचा असतो. तेव्हा हा फरक लक्षात घेत भारतीय पंचांगामध्ये दर वर्षाने येणारा एक महिना अधिक महिना मानला जातो. यायोगे त्या वर्षात तेरा महिने असतात.
चांद्रगणनेप्रमाणे आपल्या वर्षाची सुरूवात वसंत ऋतूमध्ये होते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आपण वर्षाचा प्रारंभ मानतो. त्याला संवत्सर (वर्ष) प्रतिपदा असेही म्हटले जाते. सर्वसामान्यपणे सगळे हिंदू हा सण पाळत असल्याचे म्हटले जात असले तरी पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या हिंदूंची कालगणनेची ही पद्धती नाही, हे समजून घ्यायला हवे. केवळ महाराष्ट्रात आणि इतर काही भागांमध्येच ही पद्धत आहे. कारण सौराष्ट्रातील व्यापारी मंडळींचे पंचाग वेगळे असते. त्यानुसार त्यांचे नववर्ष कार्तिकात सुरू होते. त्यामुळेच त्यांच्याकडे वहीपूजन दिवाळीत असते. त्याला आपण ‘मोठा पाडवा’, विक्रम संवत असे संबोधतो. म्हणजेच हिंदूंचे नवीन वर्ष काही ठिकाणी विक्रम संवतनुसार सुरू होते तर काही ठिकाणी शालीवाहन शकानुसार सुरू होते. दक्षिणेकडे तमिळनाडू आणि केरळमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या गणना आहेत. म्हणजेच संपूर्ण भारतभरातील हिंदू चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस वर्षारंभाचा मानत नाहीत. मात्र असे मानणार्यांमध्ये महाराष्ट्र प्रमुख आहे.
आत्तापर्यंतच्या ऐतिहासिक, पौराणिक काळात वा एकूणच सृष्टी जन्माला आल्यापासून कालचक्रामध्ये वर्षाचा प्रारंभ बदलत आला आहे, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. एके काळी मकरसंक्रातीला वर्षारंभ होत असे. त्या काळात एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण होत असल्यामुळे गणना तेव्हापासून होत असे. मात्र राश्यांतर बदलते असते. महाभारताच्या काळात काही ठिकाणी मार्गशीर्षामध्ये वर्षारंभ होत असे. म्हणूनच भगवतगीतेमध्ये भगवंताने ‘मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर|’ असे म्हटले आहे. तेव्हा इथेही मासाबरोबर वसंतऋतूला प्राधान्य दिल्याचे दिसते.
आपल्या कालगणनेमध्ये चैत्रात वसंत ऋतू सुरू होतो. चैत्रामध्ये दोन महत्त्वाचे सण मानले जातात. एक चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि नंतर येणारी तृतीया. या दिवशी आपण अन्नपूर्णेची स्थापना करतो आणि हळदीकुंकवाचे समारंभ संपन्न होतात. देवीला शीतपेय, शीतपदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. या महिन्यात देवीच्या पूजेचे महत्त्व असते. नंतर रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी होते. महाराष्ट्रात आणि आसपासच्या काही भागात चैत्रात साजरे होणारे हे महत्त्वाचे सण आहेत. ते सगळीकडे नाहीत.
सामुदायिक आनंदाचे प्रतीक
आपल्याकडे सगळ्या सणांशी एक पौराणिक कथा जोडलेली दिसते. तशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला दिलेली कथा म्हणजे प्रभू रामचंद्र आणि सीतामाईला वनवास घडणे. हा वनवासकाळ आणि अज्ञातवास संपवून ते अयोध्येत परतले तो म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस, वर्षारंभाचा दिवस. म्हणूनच हा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारणे हे सामुदायिक आनंद साजरा करण्याचे एक प्रतीक आहे. आजही आपण ही पद्धत पाळतो. चालीरितीनुसार आजही एका काठीला नवीन वस्त्र परिधान केले जाते. त्यावर कलश पालथा ठेवतात आणि ही गुढी फुलांनी, साखरेच्या माळांनी सजवली जाते. मुख्य म्हणजे गुढीला कडुलिंबाचा पाला लावला जातो. खरे तर सगळ्या सणांना मिष्टान्नाचे कौतुक असते. गुढीपाडव्याच्या दिवशीही भोजनात मिष्टान्न अवश्य असतात, पण गुढी उभी केली की घरातील सगळे सदस्य आधी कडुलिंबाचा पाला खातात. हा पाला आरोग्यकारक असतो, हे त्यामागचे कारण आहे. थोडक्यात, शरीरशुद्धीसाठी आवश्यक असा हा देशी औषधी उपाय आहे. वर्षारंभी तो केला जातो. खरे तर हा आरोग्यदायी पाला महिन्यातून एकदा खायला हरकत नाही. पण आपण प्रतिकात्मकतेला महत्त्व देत असल्यामुळे किमान वर्षारंभी तरी प्रतीक म्हणून तो खातो.
वसंतऋतूमध्ये नवी पालवी फुटते. वारे वाहू लागतात. निसर्ग येणार्या पावसाबाबत आशावाद निर्माण करतो. त्याची लक्षणे सृष्टीमध्ये दिसू लागतात. सगळीकडे मोहोराचा सुगंध येऊ लागतो. नवीन फलधारणेची पूर्वचिन्हे दिसू लागतात. शिमगा संपला की एखादा वळवाचा पाऊस येऊन जातो. हे सगळे आपण बघत आलो आहोत. पण आता प्रत्यक्ष सृष्टीमध्ये ही सगळी लक्षणे दिसतातच असे नाही. बदलत्या ऋतूचक्राचा हा परिणाम म्हणता येईल. पूर्वी होळी विझवायला पाऊस येतो, असे म्हटले जात असे. पण आता तसा तो येतोच असे नाही आणि आला तरी इतका अपरंपार येतो की पुढच्या पावसाळ्यातील निम्मा पाऊस या अवकाळीतच पडून जातो.
आता सणही बदलत चालले आहेत. आज फार कमी ठिकाणी चैत्रागौरी बसवली जाते. सध्या धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची लाट आली असल्यामुळे समाजाच्या एका स्तरामध्ये त्याचे पूजन होते इतकेच. समाजातील सर्व जातीजमातींमध्ये देवीचा हा उत्सव होत नाही. पण सौराष्ट्रामध्ये तो होतो. त्याला ‘दोलोत्सव’ असे म्हणतात. ‘दोल’ म्हणजे पाळणा. वसंतऋतूचा आनंद लुटण्याची, साजरा करण्याची ही एक सुंदर पद्धत आहे. यात झोपाळे बांधायचे, गाणी म्हणायची हा बायकांचा कार्यक्रम असतो. एकूणच कालगणना आणि परंपरा म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षाचा उत्सव आपण साजरा करतो. तो करायलाच पाहिजे. हा संस्कृतीचा एक भाग असल्यामुळे त्याचे जतन होणे गरजेचे आहे.अर्थात त्याच्या सादरीकरणाचे आयाम बदलत आहेत.
वसंतोत्सव
एके काळी हा सांस्कृतिक सजावटीचा सण होता. उत्सवाचा भाग होता. आता काही वेळा नाटके सादर करतात. गाण्याचे कार्यक्रम होतात. फार पूर्वी हे होतच असे. हा वसंतोत्सव म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये साजरा होत असे. गुप्तराजांच्या काळात वा त्याच्याही पूर्वी हे साजरीकरण होत असे. आपल्याकडे काही जुन्या संस्कृत नाटकांमध्ये त्याचे उल्लेख आढळतात. हा वसंतोत्सव म्हणजे प्रामुख्याने नवसर्जनाचा उत्सव असतो. हे नवसर्जन दुहेरी असते. एक सृष्टीमध्ये होणारे असते. म्हणूनच चैत्र संपता संपता नवी रोपे लावली जातात. विशेषत: वेलभाज्यांची बीजे पेरली जातात. त्याला अंकुर फुटायला सुरूवात होते. दुसर्या प्रकारचे सर्जन स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन अपत्यधारणेच्या स्वरुपात पार पडते.म्हणूनच याला युवकोत्सव (आपल्याकडील व्हॅलेंटाईन डे) असेही म्हणू शकतो. हा काळ मदनोत्सवाचा आहे, कारण मदन ही स्त्री-पुरुषांना आकर्षित करणारी कामदेवता आहे. ती कामभावना जागृत करते. म्हणूनच मदनाचा, मीलनाचा उत्सव वसंतामध्ये सर्वत्र साजरा होतो. तरुण स्त्री-पुरुषांच्या क्रीडेच्या या उत्सवासंबंधी प्रामुख्याने जुन्या संस्कृत साहित्यामध्ये वाचायला मिळते. त्याचे संदर्भ आढळतात.
आज मालिकांमधून, चित्रपटांमधून मदनोत्सव बारा महिने सुरू असतो. समाजाच्या सांस्कृतिक, कौटुंबिक धारणा बदलत असतात. आपण या बदलाचे भानही ठेवले पाहिजे. मात्र काहीही असले तरी हा कलांच्या निर्मितीचा उत्सव व्हावा, असे प्रामाणिकपणे वाटते. गुढी उभारणे, भोवती रांगोळ्या घालणे, गाणी म्हणणे हे सगळे व्हायला हवे, कारण रांगोळी घालणे ही हस्तकला आहे. नवीन पदार्थ करणे ही पाककला आहे. तेव्हा सगळ्या सणांच्या निमित्ताने सर्व कला, प्रयोगशीलता जिवंत ठेवण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येक सणाच्या निमित्ताने त्याचे सादरीकरण झाले पाहिजे. कलांची आराधना झाली पाहिजे. कारण यातूनच माणसातील सर्जनतेला वाव मिळतो आणि ही सर्जनशीलताच शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताकद आणि विशेषत: संवेदनशीलता वाढवण्यास कारक ठरते. एकीकडे संहारकतेचे युग येऊ घातलेले असताना तरुण मुलामुलींच्या मनात त्या संहाराची जागा निर्मितीने, विधायक आनंदाने घ्यावी असे वाटते. विद्ध्वंसकतेचा नाश करण्यासाठी समाजातील धुरिणांनी,विचारवंतांनी,कला क्षेत्रातील लोकांनी हे उत्सव
विधायकतेकडे न्यावेत ही अपेक्षा आपण आजच्या नव्या युगामध्ये करु शकतो कारण नव्या युगाला त्याचीच जास्त गरज आहे.
(शब्दांकन: स्वाती पेशवे)
Related
Articles
आयपीएलमध्ये बंगळुरु अव्वल स्थानावर
28 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
28 Mar 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द
28 Mar 2025
मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे
27 Mar 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
आयपीएलमध्ये बंगळुरु अव्वल स्थानावर
28 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
28 Mar 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द
28 Mar 2025
मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे
27 Mar 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
आयपीएलमध्ये बंगळुरु अव्वल स्थानावर
28 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
28 Mar 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द
28 Mar 2025
मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे
27 Mar 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
आयपीएलमध्ये बंगळुरु अव्वल स्थानावर
28 Mar 2025
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
28 Mar 2025
न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा ७३ धावांनी पराभव
30 Mar 2025
वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द
28 Mar 2025
मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे
27 Mar 2025
नेपाळच्या राजांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत