डॉ. केशवराव हेडगेवार : द्रष्टा महापुरुष   

डॉ. शरद कुंटे 

जागृत, सशक्त, संघटित, समर्थ, राष्ट्रनिर्माणाचे प्रयत्न करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त...
विसाव्या शतकामध्ये भारतामध्ये जे अनेक महापुरुष झाले त्यात केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्यांनी कलकत्त्याला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्या काळामध्ये असे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला अक्षरशः लक्षाधीश होण्याची संधी होती कारण त्या काळात देशात फारच कमी डॉक्टर होते. परंतु, केशवरावांनी हिंदू समाजाला झालेला आजार समजून घेणे अधिक महत्त्वाचे मानले.
 
सर्वसामान्य हिंदू माणूस व्यक्तिगत जीवनात धर्माचे आचरण करेल परंतु देश-धर्म-संस्कृती यांच्यासाठी आपले जीवन पणाला लावण्याची वृत्ती त्याच्याकडे नाही. त्यामुळे हेडगेवार यांनी संघाची दैनिक शाखा सुरू करून देशभक्तीचा संस्कार देणे व अशा संस्कारित हिंदूंची एक बलशाली संघटना उभारणे या कामाला प्रारंभ केला. अशा संघटनेचा समाजाला उपयोग काय? असा प्रश्न विचारणारे त्यावेळीही होतेच परंतु अशी संघटना उभी राहिली तर देशातील सुरक्षा व सुव्यवस्थेचे सर्व प्रश्न ही संघटना सोडवू शकेल असा विश्वास हेडगेवार यांनी समाजाला दिला. संघटनेच्या आधारे सुरक्षा व सुव्यवस्था कशी निर्माण करता येते याची दोन प्रात्यक्षिकेसंघ सुरू झाल्यानंतर अवघ्या एक-दोन वर्षातच हेडगेवार यांनी समाजाला दाखवली. 
 
रामटेक येथे दरवर्षी होणार्‍या रामनवमी उत्सवामध्ये प्रचंड गर्दीमुळे नेहमी गोंधळ होत असे. या गोंधळाचा फायदा घेऊन काही लोक भक्तांकडून दमदाटी करून पैसे उकळत. त्यावर्षी डॉक्टरांनी आपली संघटित शक्ती वापरून या उत्सवाला योग्य वळण लावण्याचे ठरविले.  रामनवमीच्या आदल्या दिवशीच ३०० संघ स्वयंसेवक रामटेकला जाऊन पोहोचले. जाताना त्यांनी रामदास स्वामींचे श्लोक मोठ्याने म्हणत संचलन केले. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर त्यांनी मंदिराकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर व परिसरामध्ये स्वच्छता केली. येणार्‍या भक्तांच्या रांगा लावल्या. विक्रेत्यांना एका बाजूला रांगेत उभे केले. स्वयंसेवकांची संघटित ताकद पाहून गर्दीचा गैरफायदा घेणारे पळून गेले. यात्रेमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी सर्वांना ठळक दिसेल अशा ठिकाणी स्वयंसेवकांनी सूचना देणारे फलक लावले होते. भारत सेवक समाजाचा गणवेश चढवून स्वयंसेवक आपापली कामे करत होते. लोकांना पिण्याच्या पाण्याची त्यांनी व्यवस्था करून दिली. मंदिरात चाललेले भजन -कीर्तन व इतर कार्यक्रम कोणत्याही अडथळ्याविना पार पडले. संघशक्तीचे एक आगळे-वेगळे दर्शन समाजाला झाले. पुढे अनेक वर्षे संघ कार्यकर्ते रामटेकच्या उत्सवाची व्यवस्था लावत असत. 

दंगेखोरांचे दमन

 
४ सप्टेंबर १९२७ रोजी सय्यद मीरसाहेब यांच्या पुण्यतिथीच्या मिरवणुकीचे निमित्त करून नागपूरच्या महाल परिसरामध्ये दंगल घडवण्याची योजना आखली होती. मिरवणुकीपूर्वी मशिदीमध्ये एकत्र जमून गुंडांना सूचना देण्यात आल्या व अल्लाहो अकबरच्या घोषणा देत या मिरवणुकीतील गुंड महालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शिरू लागले. परंतु यावेळी त्यांचे स्वागत दंडधारी स्वयंसेवकांनी केले. प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी चार-चार स्वयंसेवक दंड हातात घेऊन उभे होते. गल्लीत शिरलेल्या गुंडांना त्यांनी लाठीचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. पाहता पाहता गुंडांचा मोठा जमाव मध्यभागी कोंडीत पकडला गेला व सर्व बाजूंच्या गल्ल्यांमधून संघ स्वयंसेवक दंड हातात घेऊन या गुंडांना चोप देऊ लागले. पळूनही जाता येईना व प्रतिकारही करता येईना अशा अवस्थेमध्ये या गुंडांना भरपूर मार खाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. लुटालूट करणे व हिंदूंना दहशत घालणे हे उद्देश केव्हाच विरून गेले. पुढचे तीन दिवस नागपुरात ठिकठिकाणी लहान-मोठ्या चकमकी होत होत्या. 
 
श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर असलेला बाबरी ढाचा ज्यावेळी संतप्त नागरिकांनी उध्वस्त केला त्यावेळी देशभर दंगली घडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला.  परंतु त्या त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. काही मोजके अपवाद सोडता सर्वत्र दंगेखोरांना योग्य तो धडा मिळाला.ज्याप्रमाणे लोखंडाचा प्रत्येक कण हा लोहचुंबक असतोच. परंतु हे सर्व कण वेडेवाकडे जुळवले गेल्यामुळे त्यांची एकत्रित शक्ती प्रत्ययाला येत नाही. जेव्हा बाह्य विद्युत शक्तीचा प्रभाव निर्माण करून हे सर्व कण एका रेषेत जुळवले जातात, त्यावेळी शक्तिशाली चुंबक तयार होतात व अतिदूरपर्यंतच्या वस्तू देखील ते खेचून घेऊ शकतात, हेडगेवार यांनी अशी भूमिका मांडली की, या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रहिताच्या दिशेने सुसंगत केले तर त्यातून या राष्ट्रांमध्ये प्रचंड शक्ती निर्माण होईल व ही शक्ती देशांमध्ये सुरक्षा व सुव्यवस्थेची हमी म्हणून कार्य करेल. सरकार आपल्या परीने काही काम करतच असते. परंतु जेव्हा सर्व समाज स्वसंरक्षणक्षम होईल, जेव्हा सर्व समाज शिस्तीने वागू लागेल, त्यावेळी सरकारला हस्तक्षेप करण्याची वेळही येणार नाही. शंभर वर्षांपूर्वी हेडगेवार यांनी हा जो संघटनेचा महामंत्र दिला, तो २१ व्या शतकातही अखंड, स्वाभिमानी, सामर्थ्यशाली, समरस व समृद्ध भारताच्या निर्मितीची हमी आहे. 
 

Related Articles