‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री   

शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली
 
आज ३० मार्च, लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य ग्रंथ लिहून पूर्ण झाला. गीतारहस्य जयंती  निमित्त...
 
हिंदू संस्कृतीचा सर्वोत्तम, आणि कर्मयोगशास्त्राची देणगी देणारा अमौलिक ग्रंथ म्हणजे श्रीमदभगवदगीता. ह्याच ग्रंथावर आधारित लोकमान्य टिळकांच्या जीवनातील कळसाध्याय म्हणजे, ’गीता-रहस्य’ ग्रंथाची निर्मिती होय. ग्रंथात टिळकांची खोल तात्विक विचारांची मांडणी, शुद्ध, सरस, आकर्षक आणि ओघवती भाषा प्रकर्षाने जाणवते. मूळगीता निवृत्तिपर नसून प्रवृत्तिपर आहे हे टिळकांनी ग्रंथात ठासून सांगितले. हा ग्रंथ ज्ञानमूलक, भक्तिप्रधान व निष्काम कर्मयोगाच्या सिद्धान्तांनी परिपूर्ण आहे. लोकमान्य टिळकांनी याच भागवद्गीतेकडे संपूर्णपणे नव्या आणि वेगळ्या दृष्टीकोणातून बघून (’कर्मयोग’ सिद्धांतावर आधारित) ’गीता रहस्य’ ग्रंथाची निर्मिती केली आहे. हे करत असतांनाच त्यांनी ’ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगा’ चा त्रिवेणी संगम साधला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शब्दात - लोकमान्यांचे कार्य म्हणजे देवळातला गाभारा व सभामंडप आणि ’गीता-रहस्य’ ग्रंथ म्हणजे कळस’. ते पुढे म्हणतात - ’टिळकांच्या विद्वतेची चिरंतन विशाल व विमल यशोगाथा म्हणजे ’गीता-रहस्य’ ग्रंथ’.
 
या ग्रंथाचे सूक्ष्म बीजारोपण त्यांच्या बुद्धीत झाले होते १८७२ मध्ये वडील मृत्यूशय्येवर असताना. त्या वर्षी लोकमान्य अवघे १६ वर्षाचे असतांना, आपल्या मरणोन्मुख पित्याच्या समाधानासाठी त्यांनी भगवद्गीतेवरील ’भाषा-विवृत्ती’ नावाची प्राकृत टीका वडिलांना वाचून दाखवली. ती वाचत असतांना, गीतेचे अंतिम तात्पर्य काय असेल अशी जिज्ञासा त्यांना उत्पन्न झाली.  पितृनिधनकाळी ’मॅट्रिकच्या परीक्षेस बसू नये’ हा सल्ला न मानता ते परीक्षेस बसले आणि पासही झाले यावरून त्या प्रसंगात टिळकांची वृत्ती कशी होती ह्याचा अंदाज करता येतो. १८७२ ते १९११ म्हणजे ३९ वर्ष हा विषय त्यांच्या मनात होता. मंडालेच्या तुरुंगात ’गीता-रहस्य’ हा ग्रंथ लिहिल्यावरच त्यांचे समाधान झाले.
 
मामनुस्मर युद्द च (माझं स्मरण कर आणि लढ), हे गीतावचन म्हणजे टिळकांचे ब्रीदवाक्य.   ’ज्ञानी माणसालाहि कर्म सोडता येत नाही, किंबहुना ज्ञानी माणसाने तर कर्म सोडताच कामा नये’, हा गीता-रहस्यातील मध्यवर्ती सिद्धांत आहे. लोकमान्य टिळकांनी ’गीतारहस्य’ सारख्या पांडित्यपूर्ण ग्रंथाच्या प्रस्तावनेतच ’समर्पये ग्रंथमिम श्रीशाय जनतात्मने’ असे लिहून तो जनताजनार्दनाला अर्पण केला होता व ’संतांच्या उछीषठे बोलतो उत्तरे, काय म्यां पामरे जाणावे हे’ हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वचन ’गीता-रहस्य’च्या प्रस्तावनेच्या सुरवातीला देऊन लोकमान्य टिळक लिहीत गेले.  प्रास्तावनेच्या अंतिम परिच्छेदात ते म्हणतात - ’हे विचार साधल्यास सव्याज, याहीपेक्षा निदान जसेच्या तसे पुढील पिढतील लोकांस देण्यासाठीच आम्हाला प्राप्त झाले असल्यामुळे वैदिक धर्मातील राजगुन्ह्याला हा परीस ’उत्तिष्ठते उत्थीष्ठ  उच्छिष्ट जाग्रत प्राप्य वरांनीबोधित’ (उठा जागे व्हा! आणि भगवंतांनी दिलेले हे वर समजून घ्या!) या कठोपनिषिध्दतील मंत्राने प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करतो’.
 
’गीतारहस्य’ या ग्रंथाचे समर्पणपृष्ठ अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पृष्ठाचा प्रारंभ टिळकांनी पुढीलप्रमाणे केला आहे - श्रीगीतार्थः क्व गंभीरः व्याख्यातः कविभिः पुरा आचार्यैश्च बहुधा क्व मेऽल्पविषया मतिः ॥ तथापि चापलादस्मि वक्तुं तं पुनरुद्यतः | शास्त्रार्थान् सम्मुखीकृत्य प्रत्नान्नव्यैः सहोचितैः ॥
भावार्थ - मी ’अल्पमति’ असूनसुद्धा भगवद्गीतेवर भाष्य करण्याचे धाडस करणार आहे. बालो गांगाधरिश्चाहं तिलकान्वयजो द्विजः| महाराष्ट्रे पुण्यपुरे वसन् शांडिल्यगोत्रभृत्॥ ह्या वाक्यामध्ये टिळकांनी स्वतःचे नाव गुरुकुल पद्धतीप्रमाणे उद्धृत केले आहे. गुरुकुलामध्ये विद्यार्थी आपला परिचय करताना एका विशिष्ट प्रणालीला अनुसरून करत असे. तो कोणत्या गोत्रात जन्मला, कुठे राहणारा आहे, असे सांगून अभिवादन करत असे.  त्याचबरोबर, लोकमान्य टिळकांनी ’गीतारहस्य’ ह्या ग्रंथाची निर्मिती कधी केली त्याविषयीची माहिती कोड्याच्या स्वरूपामध्ये सांगितली आहे. भारतीय हस्तलिखितशास्त्रामधील मातृकांमध्ये काळ सहज न सांगता कोड्याच्या स्वरूपात सांगितला जातो. अगदी तशाच स्वरूपामध्ये लोकमान्य टिळकांनी गीतारहस्याचा काळ सांगितला आहे. शाके मुन्यग्निवसुभूसम्मिते शालिवाहने| अनुसृत्य सतां मार्ग स्मरंश्चापि वचो हरेः॥ भावार्थ - मुनी, अग्नि, वसु भू.  मुनी म्हणजे सप्तर्षी, म्हणून सात हा आकडा आला. अग्नी हे तीन आहेत (दक्षिण अग्नी, गार्हपत्य अग्नी आणि आहवनीय अग्नी) त्यामुळे तीन हा आकडा आला. वसु अष्ट आहेत म्हणून आठ हा आकडा. आणि भू म्हणजे धरा म्हणजे पृथ्वी म्हणजे एक. त्यामुळे शालिवाहन शके १८३७ या साली हा ग्रंथ लिहिलेला आहे असे टिळकांनी ह्यातून सांगितले आहे. एकम स्थानी सात, दशम स्थानी तीन, शत स्थान आठ आणि सहस्त्र स्थानी एक = शके १८३७. अशाप्रकारे हस्तलिखितशास्त्रातील काललेखनाच्या पारंपरिक युक्तीचा अत्यंत समर्पक उपयोग त्यांनी इथे केला आहे.
 
टिळकांचा विद्याव्यासंग
 
आयुष्यच यज्ञमय करा, हा गीतेचा संदेश. भगवंताची अखेरची प्रार्थना आपल्या देशबंधूंना व धर्मबंधूंना लोकमान्य टिळकांनी कर्मयोगाची ज्ञानभिक्षा घातली आहे. गीतेतील अध्यायांची संगति लावून त्यांनी असे दाखवून दिले की, गीता म्हणने कर्म, भक्ति व ज्ञान या तीन स्वतंत्र निष्ठांचा त्रिवेणी संगम. आपल्या आयुष्यातील व्यापात व आघातात त्यांनी हा जो विद्याव्यासंग चालवला तो त्यांच्या व्यक्तित्वाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. मंडाले येथे त्यांना वाटतील तेवढी पुस्तके ठेवण्याची मुभा मिळताच लोकमान्य टिळकांनी १९०८च्या नव्हेंबर पासून पुणा, मुंबई आणि विलायतेतून पुस्तके मागवण्याचा सपाट लावला. ’वेदांग ज्योतिष’ आणि ’गीतारहस्य’ लिहिण्यासाठी मागवलेल्या पुस्तकांची यादीच शेकडो पुस्तकांची होती.  ’गीता रहस्य’ अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ टिळकांनी १९१०-११ च्या हिवाळ्यात मंडाले च्या तुरुंगात लिहिला पण छापून प्रसिद्ध झाला तो मात्र त्यांच्या सुटकेनंतर १९१५च्या जुन मध्ये. ’गीता-रहस्य’ ग्रंथ, छपाईस देण्यापूर्वी हस्तलिखिताची भाषेच्या व रचनेच्या दृष्टीने नीट तपासणी व्हावी म्हणून हे काम कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याकडे टिळकांनी सोपविले. भाऊशास्त्री लेले यांनी स्वयंप्रेरणेने हस्तलिखित पाहण्याची टिळकांकडून परवानगी मिळवली, ती वाचली आणि टिळकांच्या मताला अनुकूल अशा मार्मिक सूचनाही त्यांनी केल्या. गीता रहस्य हस्तलिखितामध्ये जे पुष्कळ ग्रंथांचे उतार्‍यासह संदर्भ आले आहेत ते बिनचूक असावे त्यासाठी टिळकांनी हरी रघुनाथ भागवत यांची नेमणूक केली.  गीता रहस्य छपाईच्या आधी ही प्राथमिक आवश्यक कामे उरकून मग छपाईसाठी जी प्रत हवी ती सुवाच्य हस्ताक्षरात पाचसहा तरुणांकडून टिळकांनी तयार करविली. प्रस्तानावेत त्यांची नावे आहेत.
 
लोकमान्य टिळकांचे या पूर्वीचे दोन ग्रंथ म्हणजे - ’ओरायन’ आणि ’दि आर्टिक होम इन द वेदास’ हे इंग्रजीत होते, पण हा ग्रंथ (गीता-रहस्य) मराठीत असल्याकारणाने उत्सुकता होती. सामान्यजनतेला कर्मयोग कळावा ही टिळकांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी जवळजवळ ५०० पानी ग्रंथाची किंमत केवळ ३ रूपये ठेवली. ’गीता-रहस्य’ ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची छापील पृष्ठसंख्या ५८८ होती.  लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ मराठीत लिहिला. नंतर त्यांना तो ग्रंथ देशी भाषेतून भाषांतरित करून छापायचा होता, आणि शेवटी त्यांना फुरसत झाल्यास अथवा एखादा योग्य माणूस भेटल्यास त्याच्या करवी पुस्तकाचा मुख्य सिद्धांत सारांशाने थोडक्यात शे-दीडशे पानात इंग्रजीमध्य छापायचा होता. 
 
लोकांना कर्मयोग सांगण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिले. हा ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहिला असता तर विद्वान म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांची जी ख्याती होती, त्यात फार मोठी भर पडली असती आणि त्यांना खूप पैसेही मिळाले असते. परंतु त्यांनी तो ग्रंथ कटाक्षाने मराठीत लिहिला.  ’गीतारहस्य’ हा ग्रंथ म्हातारपणी वाचण्याचा नाही. आपले संसारातील कर्तव्य काय हे सांगण्यासाठीच गीता आहे, आणि म्हणून ती तरूणपणीच वाचावी असे टिळक सांगत. भगवद्गीता हा कर्मयोगाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांच्या परम श्रद्धेचा होता. त्यांनी ज्ञानार्जनाची आवड राष्ट्रकार्यासाठी दडपून टाकली. राष्ट्रमातेच्या चरणी त्यांनी केलेल्या विविध त्यागात हा त्याग सर्वोत्तम होता. एकोणिसाव्या शतकांत निबंधमाला, तसेच विसाव्या शतकात गीतारहस्य लोकांना कार्याची स्फूर्ति देणारे जिवंत झरे ठरले. सिद्धावस्थेतील पुरुषानेहि व्यवहार कसा करावा याचे जे शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध विवेचन टिळकांनी गीतारहस्यात केलेले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंबित झालेले आढळून येते. ’गीता रहस्य’ ग्रंथाद्वारे त्यांनी स्वतःच्या जीवनकार्याचं तात्विक समर्थन करणारी मांडणी केली.
 
गीतारहस्यातहि देशविषक कर्तव्याची महति वर्णिली आहेच. लोकमान्य टिळकांनी स्वतःपुढे आयुष्याचा जो आदर्श ठेवला होता, तोच भावी पिढ्यांपुढे ’रहस्या’च्या रूपाने ठेवला आहे.
 

Related Articles