म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!   

५.१ तीव्रतेचे धक्के

म्यानमारला एका दिवसांपूर्वीच शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले आहेत, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा शनिवारी दुपारी दुसरा एक ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वे (USGS)ने याबद्दल माहिती दिली आहे.
 
भूकंपाचे धक्के दुपारी २.५० वाजता म्यानमारची राजधानी नायपीडाव जवळ १० किमीच्या खोलीवर बसले अशी माहिती USGS ने दिली आहे. शनिवारी झालेल्या भूकंपामुळे किती नुकसान झाले तसेच यामध्ये जीवितहानी किती झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शुक्रवारी देखील याच ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले होते. नायपीडाव शहरातील बहुतेक भागातील बंद पडलेली वीज, फोन आणि इंटरनेट सेवा खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून केले जात असतानाच पुन्हा भूकंपाचे हादरे बसले.
 
म्यानमारला कालच ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसला आणि त्यानंतर अवघ्या ११ मिनिटांत दुसरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. ज्यामुळे देशभरातील इमारती, पूल, ऐतिहासिक वास्तू, रस्ते आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
प्रशासनाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार या भूकंपात किमान १,००२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २,३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांकडून ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. यादरम्यान लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारने मृतांची संख्या आणखी वाढू शकते असे म्हटले आहे. तर USGC ने म्यानमारमध्ये मृतांची संख्या १० हजारपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
 
म्यानमारच्या शेजारील देश थायलंडमध्ये ही भूकंपाने इमारती हादरल्याचे पाहायला मिळाले. तसेच बँकॉकमध्ये एक बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत देखील कोसळली. येथे किमान नऊ जणांचा मृत्यू झाला.
 

Related Articles