अमेरिकी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम   

वृत्तवेध 
 
दोन एप्रिलपासून भारतीय वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर भारतातील व्यापारी संघटनांमध्ये मोठी चिंता आहे. ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’ (सीटीआय)ने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘सीटीआय’चे अध्यक्ष ब्रिजेश गोयल म्हणाले की, अमेरिकेने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादल्यास भारतात अमेरिकन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली जाईल. ‘सीटीआय’चे सरचिटणीस विष्णू भार्गव यांनी सांगितले की अमेरिकेने कॅनडा, चीन आणि मेक्सिकोवर आधीच शुल्क लागू केले आहे आणि आता भारतीय वस्तूंवर शुल्क वाढवण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे भारताला दर वर्षी सुमारे सात अब्ज डॉलर्स (सुमारे ५८,००० कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे भारतीय निर्यातदार आणि व्यापार्‍यांच्या अडचणी वाढणार आहेत. अनेक क्षेत्रांना याचा फटका बसेल.
 
भारत अमेरिकेला धातू, मोती, चामडे, रसायने, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वस्तू, मसाले, मशिनरीचे सुटे भाग, औषधी उत्पादने आणि तांदूळ अशा अनेक उत्पादनांची निर्यात करतो. दिल्लीसह संपूर्ण भारतातील निर्यातदारांना या शुल्काचा मोठा फटका बसू शकतो. अनेक ऑर्डर्स आधीच देण्यात आल्याने आणि मोठ्या प्रमाणात माल अमेरिकेला रवाना झाल्यामुळे व्यापारी संभ्रमात आहेत. ‘सीटीआय’ अमेरिकन ‘गुड्स लीव्ह इंडिया’ ही मोहीम राबवणार आहे. ‘सीटीआय’चे सरचिटणीस गुरमीत अरोरा आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक गर्ग यांनी स्पष्ट केले की अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लादले, तर ‘सीटीआय’ अमेरिकन वस्तूंच्या विरोधात मोठी मोहीम सुरू करेल. ते म्हणाले, ज्याप्रमाणे आम्ही चिनी वस्तूंच्या विरोधात मोहीम सुरू केली आणि त्याचा परिणाम दिसून आला, त्याचप्रमाणे अमेरिकन उत्पादनांनाही विरोध केला जाईल.
 
भारतात अमेरिकन शीतपेये, वेफर्स, फूड चेन आणि अनेक सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अमेरिकेने आपल्या निर्णयाचा फेरविचार न केल्यास संपूर्ण देशात अमेरिकन उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा ‘सीटीआय’ने दिला आहे. भारत सरकारने हे प्रकरण अमेरिकेकडे राजनैतिक पातळीवर उचलून भारतीय व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण करावे, असे आवाहन ‘सीटीआय’ने केले आहे. व्यापार्‍यांच्या मते अमेरिकेने शुल्क लादल्यास भारतानेही प्रत्युत्तर दिले पाहिजे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमधील नवा संघर्ष व्यापारी जगतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आयात शुल्कामध्ये करण्यात येणार्‍या वाढीमुळे देशांमधील व्यापार संतुलन बिघडू शकते. आता अमेरिका आपल्या निर्णयावर ठाम राहते की भारत सरकार हे प्रकरण सोडवण्यात यशस्वी होते हे पहायचे.
 

Related Articles