वाचक लिहितात   

‘गाव तेथे ग्रंथालय’ चळवळीला घरघर
 
एकीकडे दरवर्षी ठिकठिकाणी शासनाच्या माध्यमातून मोठ्या थाटात ग्रंथोत्सव साजरे केले जातात. त्या ठिकाणी ‘गाव तेथे ग्रंथालय’ आणि ’वाचाल तर वाचाल’ची तीच ती टेप उगळली जाते. हजाराच्या आसपास लोकसंख्या असली तरी त्या गावातही ग्रंथालय सुरू करू, वाचन संस्कृतीला उत्तेजन देण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू, अशा वल्गना केल्या जातात आणि प्रत्यक्षात मात्र राज्यातील ४४ हजार ७३८ गावांपैकी ३२ हजाराहून अधिक गावात ग्रंथालये नसल्याचे वास्तव एका माहितीच्या अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे. ग्रंथालय संचालनालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राज्यातील अनुदानप्राप्त ग्रंथालयांची संख्या ११ हजार १५० असून राज्यात ’अ’ वर्गाची ३२९, ‘ब’ वर्गाची २०७२, ‘क’ वर्गाची ३९७२ आणि ‘ड’ वर्गाची ४७७७ ग्रंथालये आहेत. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांमध्ये ग्रंथालयांच्या संख्येत ९९९ ने लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील गावाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक गरज म्हणून ’महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७’ हा कायदा १७ डिसेंबर १९६७ रोजी अस्तित्वात आला. साहित्य संमेलनांवर कोट्यवधींची उधळण करणारे शासन ग्रंथालयांविषयी उदासीन असल्यामुळे ‘गाव तेथे ग्रंथालय’ चळवळीला घरघर लागली आहे. वाचन संस्कृतीवर तो मोठा आघात आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
कला महर्षींचा गौरव
 
राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या २०२४ च्या महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी भारतातील ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड करण्यात आली. राम सुतार यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी झालेली निवड सर्वार्थाने योग्य आहे. राम सुतार हे जगप्रसिद्ध शिल्पकार असून त्यांनी अनेक जगप्रसिद्ध शिल्पे उभारली आहेत. त्यात जगातील सर्वात उंच असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे शिल्प आहे. इंदू मिल येथे निर्माणधिन असलेल्या डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करण्याचे कामही राम सुतार हेच करीत आहेत. वयाच्या १००व्या वर्षीही ते आपले काम मोठ्या तन्मयतेने करीत आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे.
 
तिरस्कार व सूडभावना का वाढते?
 
रविवार केसरी (दि. २२ मार्च)मधील हिंजवडी बस घातपात प्रकरणी चालकावर खुनाचा गुन्हा हे वाचून खूप वैषम्य वाटले. आजकाल एकंदरीतच फोफावलेल्या तामसी वृत्ती, तिरस्कार युक्त मानहानी, सूडभावना वाढीस लागून विकोपाला जाण्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे. चतुर्थ श्रेणीसमान श्रमिकांना गृहीत धरून त्यांच्या हक्काच्या खाण्यापिण्याच्या, विश्रांतीच्या वेळेचा विचार न करता यंत्रवत राबवून घेण्याच्या, मानहानी करून वेठीस धरण्याच्या व्यवस्थापकीय मानसिकतेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अशी शोषित मानसिकता विकृतीत रुपांतरीत झाली तर या घटनेसारखा अनपेक्षित प्रसंग कुणावरही येऊ शकतो. काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्ताने मनात खदखदणार्‍या असंतोषाला, पुण्यात बेदरकारपणे एसटी चालवून वाट करून देऊन काही जीव घेणार्‍या संतोष या चालकाचे उदाहरण डोळ्यासमोर येते. नाहक बळी गेलेल्यांची आणि एका अर्थाने उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या कुटुंबांची यात काय चूक? भाड्याने गाडी करून प्रवासाला जावे लागले तरी गाडीच्या चालकाची केव्हाही निघताना, तसेच वाटेत जेवणखाण व लांबच्या प्रवासात विश्रांतीची सर्वप्रथम चौकशी करणे, माणुसकीची वागणूक देऊन त्यांचे चित्त कायम थार्‍यावर राहील हे पाहणे हे पाळणे आवश्यक वाटते. 
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
कोरोनाकाळाच्या कटू आठवणी
 
पाच वर्षापूर्वीच्या मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला. औषधे व आरोग्यविषयक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. या कालावधीत अनेक लोक स्थरांतरित झाले. गावी जाताना लोकांचे अत्यंत हाल झाले. कारखाने व उद्योग बंद असल्यामुळे अनेक मजूर रोजगारास मुकले. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा प्रथमच अनुभव आला. अनेक लोकांना कोरोना साथीने पछाडले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची सुरुवात मे २०२१ मध्ये झाली. या दुसर्‍या लाटेमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांत जास्त प्रभाव होता. दुसर्‍या लाटेमध्ये आरोग्य सेवा, ऑक्सिजनचा पुरवठा आणि रुग्णालयाच्या सेवांवर मोठा परिणाम झाला. अनेक रुग्णालयात रुग्णांना बेडसुद्धा मिळू शकले नाहीत. १६ जानेवारी २०२१ मध्ये लशीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली. २०२२ मध्ये मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरला. सर्व क्षेत्रात शिथीलता आली. सामान्य जीवन पूर्ववत होऊ लागले. २०२३ मध्ये मात्र कोरोनच्या रुग्णात मोठी घट झाली. या साथीत लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक कुटुंबातील लोक नाहीसे झाले. समाजजीवनावर हा एक मोठा आघात होता. आता कोठे जग यातून सावरले आहे. 
 
शांताराम वाघ, पुणे 
 

Related Articles