अमेरिकेत आयात होणार्‍या मोटारींवर २५ टक्के कर   

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून आयात होणार्‍या मोटारीवर २५ टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. यातून अमेरिकेला दरवर्षी १०० अब्ज डॉलरचा महसूल मिळणार आहे. अमेरिकेत परदेशी मोटारीसाठी आयात होणार्‍या साहित्यावरही हा कर लागू होणार आहे. येत्या ३ एप्रिलपासून नवे कर लागू होणार आहेत. मात्र, एखादी परदेशी कंपनी अमेरिकेत मोटार तयार करत असेल तर त्या मोटारीवर हा कर लागणार नाही.
 
अमेरिकेतील ऑटो व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र, या निर्णयाचा जागतिक स्तरावर मोटार उत्पादक कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.ट्रम्प यांच्या निर्णयाचा मोटार उत्पादक कंपन्यांच्या समभागावर परिणाम पाहायला मिळाला. अनेक मोठ्या मोटार उत्पादक कंपन्यांचे समभाग कोसळले. येत्या काळात हा निर्णय मागे घेतला जाईल का? असा सवाल ट्रम्प यांना केला असता हे दीर्घकालीन धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण, अमेरिकेत तयार होणार्‍या परदेशी मोटारींसाठी हा कर नसेल, असेही त्यांनी सांगितले.
 
अमेरिकेला मेक्सिको सर्वाधिक मोटारी पुरवतो. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, जपान, कॅनडा आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात आयात वाहनांवर २५ टक्के कराची घोषणा केली होती. मात्र, फारशी माहिती दिली नव्हती.येत्या २ एप्रिलपासून ट्रम्प प्रशासन अनेक कर लागू करत आहे. आता आयात मोटारीचा यात समावेश होत आहे. अमेरिकेचे व्यापारी भागीदार त्यांच्यावर अन्यायकारक कर लादतात. त्यामुळे आयात वस्तूंवर कर लावणे आवश्यक असल्याचे व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे.

Related Articles