जामा मशिदीच्या अध्यक्षांचा हंगामी जामीन अर्ज फेटाळला   

संभळ हिंसाचार प्रकरण 

नवी दिल्ली : संभळ हिंसाचार प्रकरणी शाही जामा मशिदीचे अध्यक्ष जफर अली यांचा हंगामी अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. तर, नियमित जामीन अर्जावर २ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
 
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश निर्भय नारायण राय यांच्यासमोर हा अर्ज सुनावणीसाठी होता. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संभळमध्ये दंगल उसळली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी २३ मार्च रोजी जफर अली यांना अटक केली होती. जफर अली यांच्यावर जमाव जमवणे, आक्षेपार्ह विधान करणे, हिंसाचार घडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोप आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील हरिओम प्रकाश सैनी यांनी दिली. जफर अली यांनी अटकेनंतर चांदौसी येथील न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने फेटाळला होता. तसेच, दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संभळ दंगलीत चार जणांचा मृत्यू झाला होता.
 
तर, अनेक जण जखमी झाले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करावा लागला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेली शस्त्रे ब्रिटन आणि जर्मनीसह इतर देशांतील निर्मिती असल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत (एसअयाटी) तपास केला जात आहे. ’एसआयटी’ने या हिंसाचाराशी संबंधित १२ प्रकरणांपैकी ६ प्रकरणांमध्ये ४,००० पानांपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे; ज्यामध्ये १५९ जणांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Related Articles