देशातील अणुऊर्जा क्षमता पाच वर्षात वेगाने वाढणार   

मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली : देशातील अणुऊर्जेची स्थापित क्षमता सध्याच्या ८.१८  गीगावॅट वरून २०२९-३० पर्यंत १३ गीगावॅट वर पोहोचेल आणि २०३२ पर्यंत सर्व मंजूर प्रकल्प पूर्ण झाल्यावर ती २२.५ गीगावॅट पर्यंत वाढेल. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरूवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली.
 
जितेंद्र सिंह म्हणाले, या अर्थसंकल्पात आण्विक मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. मला खात्री आहे की येणार्‍या काळात, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे. याची इतिहास देखील नोंद घेईल. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, अणु क्षेत्रात खाजगी सहभागाला परवानगी दिल्याने अणु क्षमतेत जलद गतीने वाढ होण्याची अपेक्षा आहे, ज्यासाठी अणु क्षेत्रात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग आणि भागीदारी सुलभ करण्यासाठी कायदेविषयक बदलांचा पाठपुरावा केला जात आहे.
 
सिंह पुढे म्हणाले, भविष्यासाठी इष्टतम ऊर्जा मिश्रणासाठी सर्व उपलब्ध ऊर्जा स्रोतांचा लाभ घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ग्राहकांना किमान किंमतीत वीज मिळेल.  केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा संक्रमण धोरणाचा एक भाग म्हणून अणुऊर्जेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सरकारने २०४७ पर्यंत १०० गीगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्याचे सिंग यांनी सांगितले. 

Related Articles