वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकाची बैठक रद्द   

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयकासंदर्भात संसद भवनात होणारी बैठक केंद्र सरकारने अचानक रद्द केली. अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात पुढील आठवड्यात २ ते ४ एप्रिल रोजी वक्फ विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी आणण्याची दाट शक्यता असताना, ही महत्त्वाची बैठकच सरकारने रद्द केल्याने याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
 
नवीन संसद भवनाच्या समन्वय सभागृहात बुधवारी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत ही बैठक प्रस्तावित होती. सामान्यतः संसदेत कोणतेही विधेयक सादर करण्यापूर्वी सदस्यांना त्याची तांत्रिक व इतर माहिती देण्याबाबत लोकसभा सचिवालयाकडून ही बैठक आयोजित केली जाते. ‘वक्फ’वरील बैठकीसाठी विधेयकाची रूपरेषा तयार करणारे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार होते. मात्र, बैठकच रद्द करण्यात आल्याचे खासदारांना ऐनवेळी कळविण्यात आले. त्यावरून कदाचित हे विधेयक आता चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर न करण्याचे सरकारने ठरविले असावे, अशी शक्यता एका विरोधी खासदाराने व्यक्त केली.
 
देशभरातील मुस्लिम संघटनांच्या तीव्र विरोधानंतर हे विधेयक ईदनंतर सादर करण्याचा सरकारचा हेतु बदलल्याची शक्यताही व्यक्त होते. या नेत्याच्या म्हणण्यानुसार, वक्फ विधेयकाविरुद्ध मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिल्लीपासून देशभरात निषेध निदर्शने सुरू केली आहेत. त्यांना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचीही साथ मिळत असून, यावरून इंडिया आघाडीतही एकजूट दिसत आहे.

Related Articles