विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना   

नवी दिल्ली : गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी बँक ऑफ बडोदाने गुरुवारी पीएम-विद्यालक्ष्मी योजना जाहीर केली.  देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत मिळावी व आर्थिक अडचणींमुळे दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.  
 
विद्यार्थी पीएम-विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे बँक ऑफ बडोदाकडे योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात. देशभरातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडे ८ हजार ३०० पेक्षा जास्त शाखांव्यतिरिक्त १२ शैक्षणिक कर्ज मंजूरी कक्ष स्थापन केली आहेत.बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय मुदलियार म्हणाले, पीएम-विद्यालक्ष्मी योजना हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. जो पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्याचा प्रयत्न करतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. बँक ऑफ बडोदा ही योजना थेट सुरू करणारी   पहिली बँक असल्याचे मुदलियार यांनी सांगितले. 
 
देशातील उच्च शिक्षण देणार्या सर्वोच्च ८६० शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. योजनेअंतर्गत ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला भारत सरकारकडून ७५ टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाणार असून यामुळे बँकांना व्याप्ती वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

Related Articles