आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी   

सातारा,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार महाराष्ट्रातील आयटी प्रकल्पांची स्थापना-संचलन महानगरांशिवाय त्रिस्तरीय म्हणजेच लहान, मध्यम आणि मोठ्या शहरामधून करण्यात यावी, पुणे मेट्रोसिटीचे जवळ व मध्यम शहर असलेल्या सातार्‍यात अशा आयटी कंपन्यांच्या कार्यक्षमतेला वाव आहे. याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे सुविधा, मुबलक जागा आणि पायाभूत सुविधा, चांगले हवामान यांसारख्या अनेक सकारात्मक बाबी उपलब्घ आहेत. महानगरांवरील असणारा ताण थोड्याफार प्रमाणात कमी होण्यासाठी त्रिस्तरीय शहरांमध्ये आयटी प्रकल्प राबविण्याबाबत राज्यसरकारशी समन्वय साधून एसओपी (स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) निश्चित करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
 
याबाबत खासदार भोसले यांनी वैष्णव यांना लोकहितासाठी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आयटी प्रकल्पांचे संचलन राज्यातील त्रिस्तरीय शहरामधून करण्याबाबत धोरण आहे. या धोरणामुळे मेट्रो सिटींवर पडणारा ताण कमी होण्याबरोबरच त्रिस्तरीय शहरामधील युवकांना स्थलांतर कमी होऊन, त्यांना आपल्या शहरातच रोजगार उपलब्ध होणे आणि त्या योगे, शहरांचा अप्रत्यक्षपणे स्थानिक आर्थिक विकास होणार आहे. त्रिस्तरीय शहरामध्ये पुरेशी मुबलक जागा उपलब्ध होणे सहज शक्य आहे. 
 
आयटी प्रकल्प राबविणे मेट्रोसिटीपेक्षा कमी खर्चिक असणार आहे. मेट्रोसिटींमध्ये होणारी दगदग-धावपळ देखील काही प्रमाणात कमी होणार आहे. संतुलित पर्यावरण पूरक स्थानिक विकास साध्य होणार आहे. आयटी क्षेत्रातील नोकरदारांचा दैनंदिन निर्वाह महानगरांतील खर्चापेक्षा कमी खर्चात होणार आहे.सातारा येथे आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्रिस्तरीय शहरामध्ये आयटी कंपन्या कार्यरत झाल्यास, आयटी बरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कंडक्टर सारख्या क्षेत्राला सुद्धा वाव मिळणार आहे. आदी बाबी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनात नमूद केल्या आहेत.खासदार भोसले यांनी मांडलेली वस्तुस्थिती निश्चितच स्वागतार्ह आहे. याबाबत लवकरच राज्यसरकारशी समन्वय साधून धोरण ठरवू असे आश्वासन यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना अश्विनी वैष्णव यांनी दिले. यावेळी काका धुमाळ, विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते.

Related Articles