पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करा   

संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांची मागणी

बेल्हे,(प्रतिनिधी) : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी सात एप्रिल रोजी आळेफाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करणार असल्याचे संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी यांनी सांगितले.राजुरी (ता.जुन्नर) येथे, पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जुन्नर, आंबेगाव, शिरूर, संगमनेर तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांची बैठक झाली. या बैठकीत पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्र.११ची आखणी बागायती व सुपीक जमीन क्षेत्रातून केले असल्याने तो रद्द करावा. हा महामार्ग झाल्यास शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याने त्यास विरोध दर्शविण्यासाठी तीव्र आंदोलनाच्या उद्देशाने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, संगमनेर तालुक्यातील दोनशेहून अधिक शेतकर्‍यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. राजुरी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, एम.डी.घंगाळे, मोहन नायकवडी, जि. के. औटी, सुरेश बोरचटे, कान्हु करंडे, मधुकर कारंडे आदी उपस्थित होते. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा, अशी भूमिका बाधित शेतकर्‍यांनी घेतली असताना सरकार दडपशाही करून जमिनी ताब्यात घेत आहे. दडपशाही करणार असाल तर संपूर्ण बाधित कुटुंबांना जनावरांसह जेलमध्ये टाका, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही संघर्ष करणार असल्याचे औटी यांनी सांगितले. 
 
या पट्ट्यातील शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती व दूध व्यवसाय हा आहे. मात्र हा मार्ग गेल्यास त्यांचे उत्पादनाचे साधन राहणार नाही तसेच अनेक शेतकरी जमीन गेल्याने पूर्ण विस्थापित होणार आहेत. यापूर्वी देखील पिंपळगाव जोगा कालवा, कुकडी डावा कालवा, नगर कल्याण महामार्ग, नियोजित नगर रेल्वे मार्ग, आदींचा देखील सर्वे सध्या सुरू असल्याने या पट्ट्यातील शेतकरी पूर्ण अडचणीत येणार असल्याचे माऊली शेळके यांनी सांगितले. दरम्यान मध्यंतरी बाधित शेतकर्‍यांनी प्रकल्पास विरोध करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. शेतकर्‍यांचा विरोध लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या होत्या. दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन हा महामार्ग रद्द करण्यात यावा, रद्द झाल्याचे आधी सूचना राज्य सरकारने तात्काळ काढावे, अशी मागणी केली. दिलीप वळसे पाटील यांनी या अधिसूचना रद्द होण्याच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही झाली असून येत्या दिवसात मुख्यमंत्री यांची सही होऊन रद्द झाल्याचे आधी सूचना निघेल असे आश्वासन दिले होते.    

Related Articles