टिमवित ‘कांजी स्पर्धा’ उत्साहात   

जपानी भाषा शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागात नुकतीच ‘कांजी स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. कै. विनय साठे सेन्सेई आणि कै. श्रीराम नाशिककर सेन्सेई यांच्या स्मरणार्थ दर वर्षी ही कांजी स्पर्धा आयोजित केली जाते. जपानी भाषा शिक्षणातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. यंदा हा स्पर्धेचे दहावे वर्ष होते.
 
स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जपानी भाषेतील कांजी (लिपी) शिकण्याची आवड आणि ज्ञान वाढविण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते. यात विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनकौशल्याचा कस लावत विविध कांजी अक्षरांची अचूकता आणि सखोल समज सादर केली जाते. या स्पर्धेचे प्रायोजक रिकिआन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम कुलकर्णी  आणि प्रोसिड टेक्नॉलॉजीचे संस्थापक समीर लघाट हे उपस्थित होते. ही स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर एका संस्कृतीचा आणि शिकण्याच्या उत्साहाचा उत्सव असल्याचे यावेळी गौतम कुलकर्णी यांनी सांगितले. टिमवितील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आनंद होतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टिमविच्या जपानी भाषा विभागातील  प्राध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेमुळे पुण्यातील जपानी भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांचे एक उत्तम व्यासपीठ तयार होत आहे.स्पर्धेतील विजेत्यांना रोख व ट्रॉफी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खरा सन्मान हा ज्ञानार्जनाचा आणि भाषेच्या वाढीचा असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. जपानी भाषेच्या शिक्षणाला चालना देणार्‍या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles