उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यंगचित्राचे फलक लावल्याप्रकरणी गुन्हा   

पुणे : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, छत्रपती संभाजी महाराज पुलावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र लावून कुणाल कामरा याने कवितेमध्ये वापरलेल्या शब्दांवर बंदी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याप्रकरणी फलक लावणार्‍या अज्ञाताविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
राजेंद्र भानुदास केवटे (वय ४२, पर्णकुटी पायथा, लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे केले होते. त्यावरुन सध्या राज्यात मोठा गदारोळ सुरु आहे. कामरा याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कामरा याचे समर्थन करणारा फलक छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळ लावण्यात आला आहे. या फलकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याखाली ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का? असा मजूकर लिहिण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या सोबत कुणाल कामरा याचे देखील या फ्लेक्सवर व्यंगचित्र काढण्यात आले आहे. त्याच्याखाली शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर व त्यासोबत मशाल होते.

Related Articles