पीडित तरुणीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप   

कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह; पत्राद्वारे खदखद व्यक्त 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणीने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. त्यासाठी तिने पत्राचा आधार घेत आपली खदखद व्यक्त केली आहे. प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत आलेल्या धक्कादायक अडचणी स्पष्ट केल्या आहेत. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील तरुणीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नुकतीच भेट घेतली आहे. तसेच, तरुणीने प्रधान सचिवांना एक पत्र सुध्दा लिहिले आहे. या पत्रात तिने मोठी मागणी केली आहे. असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच, पुणे पोलिसांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. पत्रात पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पत्रात अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख करताना तिने म्हटले की, पुरूष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना सुध्दा संमती घ्यायचे. त्यानंतर माझी वैद्यकीय चाचणी करायचे. अनेक पुरूष पोलीस अधिकार्‍यांनी माझ्यावर अत्याचार कसा झाला हे सांगायचे. मला तीन वकिलांची नावे सूचविली आहेत. यातून एक निवडावा, असे सांगण्यात आले. मात्र, नंतर मला विचारले देखील नाही. मला माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का? असा धक्कादायक आरोप तरूणीने केला आहे. 
 
ती पुढे म्हणाली की, याबाबत मी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांना लेखी पत्र देऊन वकील असीम सरोदेंची नेमणूक करण्याची मागणी केली होती. पण त्यांनी मला इत्तर वकिलांची नावे सुचवली. एका अन्यायग्रस्त पीडितेच्या मताला काहीच महत्व नाही, असा कोणता कायदा आहे का? असा सवालही तिने या पत्रातून केला आहे. यानंतर तरूणीने आरोपीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी दत्ता गाडेने तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला असल्याचे तिने पत्रात नमूद केले आहे. तसेच, आरोपीने तिसर्‍यांदा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा मी पूर्ण ताकदीने विरोध केला. त्यानंतर गाडेने पळ काढला, असे तिने या पत्रात लिहिले आहे.  
 
पुढील कारवाईकडे लक्ष 
 
तरुणीच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडित महिलांना न्याय मिळावा, यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे. मात्र, या मागणीला पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तिला चांगला वकील न्यायदानासाठी मिळाला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, एकंदरीत पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर आणि तरुणीच्या मागण्यांवर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

Related Articles