येरवडा कारागृहात गाडे याचा मुक्काम वाढला   

न्यायालयीन कोठडीत वाढ 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्याने त्याचा येरवडा कारागृहात मुक्काम आता वाढला आहे. न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला.  स्वारगेट एसटी बसस्थानकाच्या आवारात एका प्रवासी तरुणीवर २५ फेब्रुवारी रोजी गाडे याने अत्याचार केला. त्यानंतर या प्रकरणात आरोपी गाडेला अटक करण्यात आली. गाडेची डीएनए चाचणी झाली असून, त्याचा अहवाल पोलिसांना अद्याप मिळालेला नाही. डीएनए अहवाल मिळाल्यानंतर लवकरच त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 
  
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. गाडेला कारागृहात भेटण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती देखील त्याचे वकील वाजेद खान-बिडकर यांनी केली आहे. त्याला खटल्याबाबत काही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित तरुणीच्या वतीने वकील श्रीया आवले उपस्थित होत्या. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे केली आहे.

Related Articles