लखनऊचा जबरदस्त विजय   

हैदराबाद : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने  आपला दुसरा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध खेळला. मात्र गोलंदाजीच्या जोरावर लखनऊच्या संघाने हा सामना ५ फलंदाज राखुन जिंकला. यावेळी लखनऊ संघाकडून नव्याने समाविष्ट केलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटर शार्दुल ठाकूर याने महत्त्वपुर्ण ४ फलंदाज बाद केले. शार्दुल ठाकूरमुळेच लखनऊच्या संघाला जबदस्त विजय मिळविता आला. त्याला साथ देताना आवेश खान, दिग्वेश राठी, रवी भिष्णोई, आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. 
 
या सामन्याआधी लखनऊच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊच्या संघाने मात्र जबदस्त गोलंदाजी करत हैदराबादला १९० धावांवर रोखले. त्यामुळे लखनऊच्या संघाला १९१ धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. यामध्ये लखनऊचा सलामीवीर मिचेल मार्श याने ५२ धावा केल्या. त्याच्या शानदार अर्धशतकामुळे संघाची सुरुवात चांगली झाली. त्यानंतर त्याला साथ देणारा मार्कराम मात्र १ धाव काढून तंबूत माघारी परतला. महमद शमी याने शानदार गोलंदाजी करत कमिन्सकडे त्याला बाद केले.
 
तिसर्‍या क्रमांकावर आलेला निकोलस पूरन याने ७० धावा केल्या आणि लखनऊ संघासाठी दुसरे अर्धशतक केले. पूरन याला कमिन्स याने पायचित पकडले. त्यानंतर मधल्या फळीत रिषभ पंत आला आणि त्याने १५ धावा केल्या. यावेळी त्याने १ षटकार मारला. मात्र त्यानंतर पंतला हर्षल पटेल याने चकविणारा चेंडू टाकला. आणि महमद शामी याने त्याचा झेल पकडला. त्यानंतर आयुष बडोनी हा देखील अवघ्या ६ धावा करून तंबूत माघारी परतला. त्यानंतर अनुभवी फलंदाज डेविड मिलर याने नाबाद १३ धावा आणि अब्दुल समद याने नाबाद २२ धावा काढत सामना लखनऊ संघाला जिंकून दिला. तसेच १४ अवांतर धावा संघाला मिळाल्या. 
 
त्याआधी फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादच्या संघाला म्हणावी तशी चांगली फलंदाजी करता आली नाही. हैदराबादचा सलामीवीर हेड हा ४७ धावांवर बाद झाला. प्रिन्स यादव याने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर लगेचच अभिषेक शर्मा ६ धावांवर बाद झाला. तर इशान किशन शून्यावर बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी याने ३२ धावा केल्या. रवी भिष्णोईने त्याचा त्रिफळा उडविला. क्लासेन २६ धावांवर धावबाद झाला. अनिकेत वर्मा याने ३६ धावा केल्या. तर कमिन्सला १२ धावा करता आल्या. 
 
संक्षिप्त धावफलक 
 
लखनऊ : मिचेल मार्श ५२, पूरन ७०, मार्कराम १, पंत १५, आयुष बडोनी ६, मिलर १३, अब्दुल समद २२ एकूण : १६.१ षटकांत १९३/५
हैदराबाद : हेड ४७, नितीश रेड्डी ३२, क्लासेन २६, अनिकेत वर्मा ३६,कमिन्स १८, हर्षल पटेल नाबाद १२, महमद शामी १, सिमरनजीत सिंग नाबाद ३, अवांतर ७ एकूण २० षटकांत १९०/९   

Related Articles