सरकारी तिजोरीत प्राप्तिकराचा मोठा भरणा   

वृत्तवेध 

चालू आर्थिक वर्षात करवसुलीमुळे सरकारी तिजोरी सातत्याने भरली जात असून, यामध्ये करदात्यांकडून कर विभाग वसूल करणार्‍या कॉर्पोरेट करापेक्षा बिगर कॉर्पोरेट कर संकलन अधिक झाले आहे. २०२४-२६ या आर्थिक वर्षात १६ मार्चपर्यंत थेट करसंकलन १३.१३ टक्के वाढीसह २१.२६ लाख कोटी रुपये झाले.
 
चालू वर्षात, सरकारने आगाऊ कराच्या चार हप्त्यांमधून १०.४४ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. ते गेल्या आर्थिक वर्षातील ९.११ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १४.६२ टक्क्यांनी वाढले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर भरणा करण्याचा शेवटचा हप्ता १५ मार्च २०२५ रोजी देय होता. कॉर्पोरेट कर श्रेणीतील आगाऊ करसंकलन १२.५४ टक्क्यांनी वाढून ७.५७ लाख कोटी रुपये झाले आहे तर गैरकॉर्पोरेट श्रेणीतील आगाऊ कर संकलन २०.४७ टक्क्यांनी वाढून २.८७ लाख कोटी रुपये झाले आहे.
 
प्राप्तिकर कायद्याच्या कलम २०८ नुसार अंदाजे कर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असणार्‍यांनी त्या वर्षासाठी आगाऊ कर भरणे आवश्यक आहे. त्यात पगारदार करदात्यांचाही समावेश आहे. आर्थिक वर्षात १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १५ मार्च या चार हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरला जातो. ‘सीबीडीटी’ने जारी केलेल्या कर संकलनाच्या आकडेवारीनुसार, नॉन-कॉर्पोरेट कर संकलन १७ टक्क्यांनी वाढून सुमारे ११.०१ लाख कोटी रुपये झाले आहे. १ एप्रिल २०२४ ते १६ मार्च २०२५ दरम्यान कॉर्पोरेट करसंकलन केवळ सात टक्के वाढीसह ९.६९ लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारात मोठी घसरण होऊनही, शेअर्सच्या विक्री आणि खरेदीवरील सुरक्षा व्यवहार करसंकलन सुमारे ५६ टक्क्यांनी वाढून ५३ हजार ९५ कोटी रुपये झाले आहे तर गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ३४ हजार १३१ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. या कालावधीत ४.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा देण्यात आला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ३.४७ लाख कोटी रुपयांचा परतावा दिला होता. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजांमध्ये सरकारने प्राप्तिकर संकलन १२.५७ लाख कोटी रुपये राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Related Articles