वाचक लिहितात   

नव्या बदलाचे स्वागत करा
 
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर ‘वर्णनात्मक परीक्षेचे आव्हान’ हे वृत्त वाचले. नुकतीच आयोगाने राज्यसेवा २०२५ नवीन परीक्षा पद्धत लागू झाली. स्पर्धा परीक्षा आंदोलनात मागील दोन वर्षांपूर्वी एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक परीक्षा पद्धतीला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन छेडले होते. विद्यार्थी हिताखातर असो वा अन्य काही कारण असेल; मात्र आयोगाने दोन पावले मागे घेत सुधारित परीक्षापद्धती पुढील दोन वर्षांनंतर म्हणजेच २०२५ नंतर लागू होईल असे स्पष्ट केले. तेव्हापासूनच नव्या-जुन्या विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने सावरत वर्णनात्मक परीक्षा पद्धतीनुसार तयारी सुरू केली; मात्र एमपीएससीमधीलच आजही जे विद्यार्थी फार पूर्वीपासून जुन्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी करत असत, त्यांना मात्र आयोगाचा हा निर्णय निराशाजनक जरी वाटत असला तरी जुळवून घेणे भाग आहे. सारांश, एमपीएससीची जुनी परीक्षापद्धत आता बदलत्या वातावरणानुसार बदल करणे गरजेचे असल्याने आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून परीक्षार्थींनी स्वत:त बदल करून नव्या परीक्षा पद्धतीला सामोरे जावे! कारण हा बदल गरजेचाच आहे.
 
सत्यसाई पी.एम., गेवराई (बीड)
 
फिनलँडकडून शिकण्यासारखे!
 
जगातील सर्वांत आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये फिनलँड सलग आठव्यांदा आनंदी देश म्हणून अव्वल राहिला. खरोखर हे एक उत्तम उदाहरण! वर्ल्ड हॅपीनेस अहवाल नुकताच प्रकाशित झाला. यात जगभरातील सर्वांत आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. यात १४७ देशांपैकी फिनलँड देश हा सर्वांत आनंदी देश म्हणून प्रथम स्थानावर आहे. सर्वांत शेवटी अफगाणिस्तान आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत ११८व्या स्थानावर आहे. मागील २०२४ व्या वर्षी आपण १२५ व्या स्थानी होतो. फिनलँडबरोबरच डेन्मार्क, आइसलँड, नॉर्वे व स्वीडन यांचा १० देशांच्या यादीत समावेश आहे; परंतु जगातील सर्वांत श्रीमंत व शक्तिशाली देश अमेरिका या १० देशांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. वर्ल्ड हॅपीनेस अहवालासाठी त्या-त्या देशातील लोकांची जीवनशैली, त्यांचा जीडीपी, सामाजिक आधार, अत्यल्प भ्रष्टाचार, एकमेकांप्रती असलेली प्रेमाची भावना याचा आधार घेण्यात आला. आरोग्य सुविधा, पर्यावरणाला महत्त्व, भ्रष्टाचाराचे नगण्य प्रमाण, फिनलँडकडून निसर्गाची जोपासना, कुटुंबांसाठी वेळ, पुस्तक वाचन, आवडीच्या छंदाला महत्त्व, सामाजिक बांधिलकी जपणे यांसारख्या गोष्टींमुळे फिनलँड देश आनंदी देशांच्या यादीत अव्वल ठरला आहे. आनंदी कसे राहावे हे फिनलँडकडून शिकण्यासारखे आहे. 
 
संतोष शिंदे, श्रीगोंदा
 
विदेशी चलनात वाढ
 
आज विदेशात नोकरी किंवा उद्योग या निमित्ताने अनेक भारतीय जात आहेत. जागतिक स्थलांतरितांमध्ये हा वाटा ४.३ टक्क्यांवरून ६ टक्क्यावर गेला आहे.  आज नोकरीबरोबरच अनेक विद्यार्थी विदेशी शिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडून भारतात २३-२४ मध्ये जे ११८.७ अब्ज डॉलर्स पाठविले गेले, त्यामध्ये सुमारे २७.७ टक्के रक्कम एकट्या अमेरिकेतून आली आहे. त्या खालोखाल रक्कम युनायटेड अरब अमिरात या देशातून आली आहे. ब्रिटन, सिंगापूर, कतार, सौदी अरेबिया यांचाही वाटा मोठा आहे. एकूणच विदेशी भारतीयांनी देशात पैसे पाठवून मोलाची मदत केली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. या विदेशातून आलेल्या पैशांबाबत आणखी एक गमतीशीर बाब म्हणजे येणार्‍या डॉलर्सपैकी तब्बल २०.५ टक्के एवढी रक्कम एकट्या महाराष्ट्रीयन व्यक्तींनी पाठविली आहे.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
युवा पिढी तंबाखूच्या विळख्यात
 
भारतात तंबाखू सेवनामुळे दररोज हजारो लोक मरण पावतात. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटिन नावाच्या घटकामुळे अनेक आजार होतात. तरीही भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे ही गंभीर बाब आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गात तंबाखू सेवनाचे तर तरुण मुलांमध्ये सिगारेट ओढण्याचे तसेच मावा, गुटखा खाण्याचे प्रमाण अधिक आहे. आजची युवा पिढी गुटखा, मावा आणि सिगारेटच्या पूर्ण आहारी गेली आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही खुलेआम गुटखा विकला जातो. गुटख्याची खुलेआम विक्री होत असताना प्रशासन मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. युवा पिढीला तंबाखूच्या विळख्यातून सोडवायचे असेल, तर सरकारने कठोर निर्णय घ्यायला हवेत. राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व सेवनावर बंदी घालायला हवी. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles