न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानाची पोलिसांकडून पाहणी   

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या भोवती चौकशीचा फास आणखी आवळला जात आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी वर्मा यांच्या निवासस्थानाची कसून पाहणी केली. पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक काल दुपारी दीडच्या सुमारास वर्मा यांच्या घरी दाखल झाले. सुमारे दोन तास हे पथक येथे होते. या पथकाने वर्मा यांच्या घराची कसून पाहणी केली. त्यानंतर, हे पथक तुघलक रोड पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
 
सध्या वर्मा यांची विभागीय चौकशी सुरू आहे. तीन सदस्यांची समिती ही चौकशी करत आहे. या समितीने मंगळवारी वर्मा यांच्या निवासस्थानाची दोन तास पाहणी केली होती. 
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी ही समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. १४ मार्च रोजी रात्री साडे-अकराच्या सुमारास वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली होती. या घटनेनंतर वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड सापडली होती. या घटनेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांनी अहवाल सादर केला होता. 
 

Related Articles