मला सभागृहात बोलू दिले जात नाही   

राहुल यांचा ओम बिर्ला यांच्यावर आरोप

नवी दिल्ली : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला मला सभागृहात बोलू देत नाहीत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.जेव्हा-जेव्हा मी लोकसभेत बोलण्यासाठी उभा राहतो, तेव्हा मला बोलू दिले जात नाही. मी बोलण्यासाठी उभे राहिलो असता, सभापती कामकाज तहकूब करतात, असा आरोप राहुल यांनी केला. गेल्या ७-८ दिवसांपासून विरोधी पक्षनेता म्हणून मला बोलण्याची परवानगी दिली जात नाही. सभागृहात विरोधी पक्षासाठी जागा नाही. फक्त सरकारसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमधील कुंभमेळ्याबद्दल बोलले, मलाही बोलायचे होते; पण मला परवानगी दिली नाही. सभागृह पूर्णपणे गैर-लोकशाही पद्धतीने चालवले जात आहे, असा आरोप राहुल यांनी यावेळी केला.
 
दरम्यान, सभापती बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला होता. यासंदर्भात बिर्ला म्हणाले की, तुम्ही सर्वांनी सभागृहाचा दर्जा आणि शालीनता राखणे अपेक्षित आहे. सभागृहात अशा अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत, सदस्य आणि त्यांचे आचरण सभागृहाच्या उच्च परंपरेला अनुसरून नाही. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा पाळा. यावर राहुल गांधी यांना काही बोलायचे होते; मात्र सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर राहुल गांधी बाहेर आले आणि सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला.
 

Related Articles