टीचभर पोटासाठी बालिकेची जीवावर बेतणारी कसरत   

बेल्हे : स्वराज्याचे सुराज्य होण्यासाठी सामान्य माणूस सुखी होणे ही गरज आहे. सामान्य माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा योग्यरीतीने भागेपर्यंत देशाच्या प्रगतीबद्दल पूर्ण समाधान मानता येणार नाही. मात्र आजही वस्त्र आणि निवारा नाहीच पण टीचभर पोटासाठी जीवावर बेतणारी कसरत करूनही पोटाची खळगी भरत नाहीत.
 
छत्तीसगड येथे राहणारी आता महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेली अवघी सात वर्षांची डोंबार्‍याची चिमुरडी जेव्हा दहा फूट उंचीवरच्या तारेवरून जीवावर बेतणारी कसरत करते तेव्हा पाहणार्‍याच्या अंगावर शहारे येतात, आश्चर्याचा धक्का बसतो. तिची अगतिकता पाहून मन हेलावतेही. जमिनीवरील कसरती सरावाने कोणी करील पण तारेवर चालणे, तारेवर ताटली ठेवून तिच्यावर चालणे, डोक्यावर भांड्याची उतरंड ठेवून तारेवरून चालणे अशा विविध अजब कसरती ती करून दाखवते. तिच्यासमवेत असतात तिचे आई-वडील. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली परिस्थिती कथन केली. जिवावरच्या कसरती करूनही पैसे मिळताच असे नाही. पैसे मिळाले नाही तर उपाशीपोटीच आम्ही झोपतो. 
 
आभाळाचे छत आणि जमिनीची गादी हेच आमचे घर समजतो. कधी-कधी दानशूर लोक पैसे देतात. ५० ते ६० रुपये बक्षिसं मिळते, पण ते नेहमीच मिळतात, असे नाही.खरंच भाकरीचा चंद्र शोधण्यासाठीच ही सगळी धडपड, रोज या गावाहून दुसर्‍या गावाला, आज इथं तर उद्या तिथं! कशासाठी? तर पोटात पेटलेली भुकेची आग शमविण्यासाठी. हेच का ते अच्छे दिन!
 
एकविसाव्या शतकात प्रत्येक जण आशेने जगतोय. परंतु एकविसाव्या शतकात तरी देशातील अठरा विश्व दारिद्र्याने पछाडलेल्यांना समाधान मिळेल का? हा एक यक्ष प्रश्न आहे. 
 

Related Articles