महापालिकेला ’राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता मोहिमे’चे द्वितीय बक्षिस   

पुणे : राज्य सरकारकडुन देण्यात येणारे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) मोहिमे’अंतर्गत महापालिका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे बक्षिस पुणे महापालिकेला जाहीर झाले आहे. इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टीम (आयडब्लूएमएस) या प्रणालीसाठी राज्य सरकारने बक्षिस जाहीर केले आहे.
 
राज्य सरकारकडुन दरवर्षी प्रशासकीय पातळीवरील कामाबाबत प्रगती करणार्‍या प्रशासकीय कार्यालयांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) मोहिम व स्पर्धा’ अंतर्गत बक्षिस दिले जाते. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, राज्यातील सर्व मुख्यालय कार्यालये, विभागस्तर समिती व महापालिका, शासकीय संस्था, शासकीय अधिकारी अशा विविध गटांसाठी प्रस्ताव मागविले जातात. त्यानुसार, संबंधित बक्षिसे जाहीर केले जातात. मागील वर्षी लोकसभा निवडणुकांमुळे राज्य सरकारने संबंधित बक्षिसांची घोषणा केली नव्हती. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी बुधवारी संबंधित बक्षिसे जाहीर केली.
 
या बक्षिसांमध्ये महापालिका स्तरावरील गटामध्ये १० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस नागपुर महापालिकेला, तर सहा लाख रुपयांचे द्वितीय बक्षिस पुणे महापालिकेला, तर चार लाख रुपयांचे तृतीय क्रमांकाचे बक्षिस चंद्रपुर महापालिकेला जाहीर करण्यात आले आहे. पुणे महापालिकेमध्ये अंदाज-पत्रकातील तरतूदीनुसार पूर्वगणक पत्रक ते अंतिम देयकापर्यंतची सर्व कामे ऑनलाईन करण्यासाठी आयडब्लूएमएस’ प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीच्या वापरासाठी संबंधित बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
 
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग गटात मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागास प्रथम, अन्न व नागरी पुरवठा विभाग द्वितीय व मराठी भाषा विभागास तृतीय क्रमांक मिळाला आहे. मुख्यालय कार्यालय स्तर गटात नागपुर विभागीय आयुक्त कार्यालय प्रथम, महिला आर्थिक विकास महामंडळ द्वितीय, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विभाग स्तरावरील गटात अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय प्रथम, वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय द्वितीय व लातूरमधील निलंगा नगर परिषद कार्यालय यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.
 

Related Articles