मोटार वाहन न्यायालयाचा मद्यपींना दणका   

२० हजारांच्या दंडासह साधी कैद 

पुणे : मद्यपान करून वाहन चालविणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. मद्यपान करून वाहन चालविणार्‍या दोघांना शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने २० हजार रुपयांच्या दंडासह एकाला चार दिवस, तर दुसर्‍याला तीन दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. 
 
दत्तात्रय आतिश टिपरे (वय -२६ रा. साने चौक, चिखली) आणि राजकुमार गरजुप्रसाद भारती (वय - ४५, रा. गणेश मंदिर, नेहरुनगर) अशी शिक्षा झालेल्या दोन मद्यपी आरोपी तरुणांची नावे आहेत. यातील दत्तात्रय याला चार दिवस, तर राजकुमारला तीन दिवसांची शिक्षा झाली आहे. पिंपरी वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी दत्तात्रय टिपरे आणि राजकुमार भारती या दोघांवर मद्यपान करून वाहन चालविल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर येथे सुनावणीसाठी आले. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
 
वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने वेगात तसेच, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून धोकादायकरीत्या चालवित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. मद्य प्राशन करून वाहन चालविणारे चालक स्वतःचे तसेच इतरांचे जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करत असतात. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, मद्यपान करून कुठल्याही चालकाने वाहन चालवू नये. स्वतःच्या व इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी. न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी मुळातच मद्य प्राशन करू नये. तसेच, इतर कोणत्याही स्वरूपाच्या मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये. 
 

Related Articles