महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार   

निलेश निकम यांचा आरोप 

पुणे : महापालिकेत डांबर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक निलेश निकम यांनी केला आहे. थेट कंपनीकडून डांबर खरेदी न केल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्युडी) असलेल्या ‘अ‍ॅप’मुळे सदर ठेकेदार नेमका कोणाला डांबर पुरवठा करतो याविषयी शंका निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
पूर्वी महापालिका रस्त्यांच्या कामासाठी थेट पेट्रोल उत्पादक कंपन्यांकडून डांबर खरेदी करीत होते. त्यामुळे महापालिकेला प्रति टनामागे साडे सहा ते सात हजार रुपये इतकी सवलत मिळत होती. परंतु गेल्या तीन वर्षापासून महापालिकेकडून थेट कंपनीकडून केली जाणारी डांबर खरेदी बंद केली गेली. तीन वर्षापूर्वी महापालिकेने डांबर खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर दरवर्षी ही निविदा काढली जात आहे. प्रत्यक्षात पुरवठादार ठेकेदाराची कंपनी या निविदेत पात्र ठरेल अशा अटी या निविदा प्रक्रीयेत टाकण्यात आल्याचा दावा निकम यांनी केला. पेट्रोल उत्पादक कंपन्या या सरकारी असल्याने त्यांच्याकडून डांबर खरेदीत ‘कमिशन’ मिळत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारामार्फत डांबर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केला.
 
ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत काढण्यात आलेल्या निविदांचा संदर्भ देत, निकम म्हणाले, ‘या कालावधीत महापालिकेच्या नोंदीनुसार दोन हजार ३०१ मेेट्रीक टन डांबर खरेदी केले गेले. या खरेदीत अनेक त्रुटी आणि भ्रष्टाचार आहे. डांबराचे दर हे पंधरा दिवसांनी बदलतात, सदर ठेकेदार हा महापालिकेला डांबराच्या प्रचलित दराच्या सहा टक्के कमी दराने डांबर पुरवठा करीत आहे. प्रत्यक्षात महापालिकेने थेट डांबर खरेदी केले तर, आणखी कमी दराने ते उपलब्ध होऊ शकते, असा दावा निकम यांनी केला.

अधिकार्‍यांशी संगनमत? 

सदर ठेकेदाराकडून डांबराची मालमोटार प्लांटमध्ये पाठविला गेल्यानंतर तेथे डांबराची चोरी होते. मालमोटारपूर्णपणे खाली केला जात नाही. अशाप्रकारे दहा मालमोटार डांबराची चोरी झाली आहे, असा आरोप निकम यांनी करीत, यात महापालिकेचे अधिकारी सामिल असल्याचा दावा केला.

 ’अ‍ॅप’मध्ये होते नोंद 

पेट्रोल उत्पादक कंपन्यांकडून पीडब्ल्युडी विभागाला ’अ‍ॅप’ पुरविले आहे. या अ‍ॅपमध्ये कंपन्यांकडून डांबर खरेदीची माहीती चलनाद्वारे कळते. या अ‍ॅपमध्ये झालेल्या डांबराची खरेदी ठराविक भागात आणि विशिष्ट कामासाठी केली गेल्याची नोंद होते. कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या चलनात याची नोंद असते, या चलनातून डांबर दुसरीकडे कोठे विक्री केल्याचा प्रयत्न केला तर त्याचा तपशील दाखविते. महापालिकेला डांंबर पुरवठा करणार्‍या ठेकेदाराने एकाच चलनावर खरेदी केलेले डांबर हे महापालिका आणि पीडब्ल्युडीला विक्री केले आहे, असा आरोप निकम यांनी केला.
 

Related Articles