स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती   

नवी दिल्ली : स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत भारताने आघाडी घेतली असून ६५ टक्के शस्त्रे देशातच तयार केली आहेत. त्यामुळे शस्त्रनिर्मितीत देश स्वयंपूर्ण होत आहे. 'मेड इन बिहार'चे बूट रशियाच्या लष्कराकडून वापरले जात असल्याची बाब उघड झाली आहे.
 
यापूर्वी ६७ ते ७० टक्के शस्त्रे परदेशातून आयात केली जात होती. त्यात आता आमूलाग्र बदल झाल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. मेक इन इंडियाला सरकारने चालना दिली. त्यामुळे देशांतर्गत शस्त्रनिर्मिती झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. २०२३ ते २०२४ दरम्यान, १.२७ लाख कोटींची शस्त्रे देशात तयार करण्यात आली. या संदर्भातील आकडेवारी संरक्षण मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली. 
 
भारतातून विविध संरक्षण विषयक साहित्यांची निर्यात केली जात आहे. त्यामध्ये बुलेट प्रुफ जॅकेट्स, डॉर्नियर विमाने, चेतक हेलिकॉप्टर्स, वेगवान बोटी, हलक्या वजनाचे टॉर्पेडो यांचा समावेश आहे. त्या शिवाय मेक इन बिहारचे बूट रशियाच्या लष्कराकडून सध्या वापरले जात असल्याने भारतीय उत्पादने दर्जेदार असल्याचे सिद्ध होत आहे.एकेकाळी परदेशी शस्त्रांवर अवलंबून असणारा देश आता भारतीय बनावटीच्या शस्त्रांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. त्या माध्यमातून लष्कराचे सामर्थ्यही वाढत आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होत असल्याने देशांतर्गत उद्योगाला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. 
 
संरक्षण मंत्रालयाने मार्च २०२४ अखेर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२९ पर्यत भारत ३ लाख कोटींचे संरक्षण साहित्याची निर्मिती करेल. जागतिक पातळीवरील शस्त्र निर्मितीचे केंद्र तो होईल. मेक इन इंडियाच्या पुढाकाराने अत्याधुनिक तोफांची निर्मिती केली आहे. त्यात धनुष्य तोफ यंत्रणा, ओढून नेता येणारी अत्याधुनिक तोफ, अर्जुन रणगाडा, हलके लढाऊ विमान तेजस, आधुनिक हलके हेलिकॉप्टर, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा, शस्त्र शोधणारे रडार, नौदलाच्या विनाशिका, भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या, समुद्रातील गस्ती नौका यांचा समावेश आहे.संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीला सप्टेंबर २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यामुळे सुमारे ७४ टक्के गुंतवणूक परदेशातून आली आहे. एप्रिल २००० पासून ५ हजार ५१६.१६ कोटींची परदेशी गुंतवणूक संरक्षण विषयक उद्योगांत झाली. 

Related Articles