पुणे, पिंपरी- चिंचवडमधील ७९ ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य!   

राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष

पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) उद्रेक झाला होता. त्यामुळे रुग्ण आढळलेल्या परिसरातील पाण्याचे ३१२ नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यातील ७९ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह खडकवासला परिसरातील पाण्याच्या नमुन्यांचा समावेश आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविले होते. नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाला असल्याने खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने होते. या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली. प्रयोगशाळेने २१ जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत एकूण ३१२ नमुन्यांची तपासणी केली. त्यातील ७९ पाणी नमुने दूषित आढळले असून, ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे. पुण्यातील जीबीएस उद्रेक फेब्रुवारीच्या अखेरीस थांबल्याने पाणी नमुन्यांची तपासणी १३ मार्चनंतर आरोग्य प्रयोगशाळेने थांबविली.
 
आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत पिण्यास अयोग्य आढळलेले नमुने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत.यात खडकवासला धरणातील पाण्यासह कूपनलिका, विहिरी, महापालिकेचा पाणीपुरवठा, खासगी जल शुद्धीकरण प्रकल्पांतील पाणी नमुन्यांचा समावेश आहे. खडकवासला धरणातील प्रक्रिया करण्यापूर्वीचे पाणी तपासणीत पिण्यास अयोग्य आढळले. याचबरोबर खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने दूषित आढळले आहेत.
 
जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणचे पाणी नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीत पाठविले होते. त्यातील अनेक नमुन्यांत ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले आहे.विनोद फाळे, उपसंचालक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा

पिण्यास अयोग्य पाणी

खडकवासला धरणातील प्रक्रिया न केलेले पाणी
खडकवासला परिसरातील काही विहिरींचे पाणी
धायरी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
तळवडे, ताथवडे, दिघी परिसरातील काही कूपनलिकांचे पाणी
काळेवाडी, वाकड, मोशी, थेरगावमधील घरगुती नळांचे पाणी
 
धायरी परिसरातील काही घरगुती नळांचे पाणी
संत तुकारामनगर, धायरी परिसरातील आरओ प्रकल्पांतील पाणी
आनंदनगर, माणिकबाग, वडगाव बुद्रकमधील जारचे पाणी
नऱ्हे गावातील घरगुती नळांचे पाणी
 

Related Articles