रूग्णाची वायसीएम रूग्णालयावरून उडी   

उपचारांसाठी आलेला रुग्ण गंभीर जखमी 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आई बरोबर आलेल्या रुग्णाने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये रुग्ण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा प्रकार मंगळवारी घडला. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे राहणारा ४० वर्षीय रुग्ण मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्याच्या आईसमवेत वायसीएम रुग्णालयात आला.
 
आई केस पेपर काढत असताना रुग्ण इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला व शरीराला गंभीर दुखापत झाली. या घटनेने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांसह पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. जखमी रूग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रूग्णाने उडी मारण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. मात्र, रुग्णाला मानसिक आजार असल्याची शक्यता संत तुकारामनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी व्यक्त केली.
 

Related Articles