इस्रायल तंत्रज्ञानाद्वारे केशर आंब्याच्या उत्पादन करून शेतकरी बंधूंचे आयुष्य बदलले   

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावच्या वाघमोडे बंधुंची केशर आंब्याची बाग ही खरोखरच शेतकऱ्यांना नवी दिशा देणारी ठरली. इतर शेतकऱ्यांचा आदर्श ठरणारी आहे, अशा भावना प्रतापसिंह परदेशी यांनी व्यक्त केल्या.
 
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुलचे शेतकरी असलेल्या संतोष वाघमोडे, समाधान वाघमोडे, सज्जन वाघमोडे या तिघा भावांनी १० एकरावर विकसित केलेली केशर आंब्याची बाग ही महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करणारी ठरली असून, राज्यातील विविध भागातूनन शेतकरी ही बाग पाहण्यासाठी आवर्जून कुरुलला येत आहेत. या बागेला भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. 
 
साखर उत्पादनात राज्यात अग्रेसर सोलापूर जिल्ह्याने फळबाग लागवडीत देखील महाराष्ट्रात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली असून, डाळिंब, द्राक्ष, यासह आंबा उत्पादनात सोलापूर जिल्हा हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष शेती बहरत असताना इथला शेतकरी हा आता आंब्याची बाग फुलवण्यावर विशेष भर देत असून, तो आंबा पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत असल्याने आंबा उत्पादनात जिल्ह्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले  आहे.
 
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल इथले शेतकरी संतोष सौदागर वाघमोडे यांनी १० एकर माळरानावर इस्त्रायल तंत्रज्ञानाचा वापर करुन, अतिघन पध्दतीने केशर आंबा लागवड केली आहे. केशर आंब्याची ही बाग अल्पावधीतचं नावलौकिक प्राप्त करणारी ठरली असून, केशर आंब्याची ही अनोखी  बाग पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आवर्जून या बागेस भेट देत आहेत आणि तितक्याच उत्सुकतेने याची माहिती देखील घेत आहेत.

बाग बघून हरखून जायला होते 

''पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या संतोष वाघमोडे यांनी सुमारे १० एकर माळरानावर केशर आंब्याची ९ हजार झाडे लाऊन ही बाग यशस्वीपणे फुलवली.  सोलापूर जिल्ह्याच्या फळबाग लागवडीच्या प्रगतीत आणखी मोलाची भर घातली आहे. अत्यंत सुंदर अशी ही आंब्याची बाग पाहताना प्रत्येकजण जणू स्वतःला हरवून जातो आणि संतोष वाघमोडे यांचे नियोजन आणि जिद्द, चिकाटी, परिश्रमाला सलाम करतो.''
 
''या बागेतील आंब्याच्या दोन झाडातील अंतर हे ४ फूट तर दोन रांगांमधील अंतर हे १४ फूट इतके असून, कोणत्याही केमिकल अथवा रासायनिक खतांचा वापर न करता जैव खतांचा विशेषतः गोमूत्र, शेण आदिंचा वापर करुन, ठिबक सिंचना द्वारे पाणीपुरवठा करुन, ही बाग विकसित केल्याने या आंब्याची गुणवत्ता खास करुन गोडवा काही औरच आहे. खास करुन मधमाशांचा वापर देखील अत्यंत योग्य पद्धतीने करुन, हा प्रयोग देखील यशस्वीपणे राबवून उत्पन्न वाढीकडे  विशेष लक्ष दिले आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट बाग म्हणून या बागेकडे पाहिले जात आहे. दहा एकर इतक्या विस्तारीत माळरानावरील नऊ हजार आंब्याची बहरलेली झाडे पाहताना हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे साकारुन इतरांना प्रेरणा देणाऱ्या संतोष वाघमोडे यांचं प्रत्येकजण आवर्जून कौतुक केल्याशिवाय राहात नाही.''
 
सोमवारी राज्याचे माजी मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांचे वडील प्रतापसिंह परदेशी यांनी मोठ्या उत्सुकतेने या केशर आंब्याच्या बागेस भेट देऊन आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या बरोबर फार्म मॅनेजर सुर्यकांत सुकटे, सुशील उघडे यांची उपस्थिती होती.         
 
यावेळी समाधान वाघमोडे यांनी प्रतापसिंह परदेशी यांना बागेविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना संधी मिळाली आणि त्यांनी जर मनावर घेतले तर किती दिव्य काम होऊ शकते हे दिसते. निश्चितच कौतुकास्पद आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देणारे हे काम आहे, अशा भावना यावेळी या मान्यवरांनी व्यक्त केल्या. 
 
संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे, सज्जन वाघमोडे या तिघा भावांनी पाण्याचे योग्य नियोजन करत, शेणखत, गोमूत्र तसेच अन्य सेंद्रिय खतांचा योग्य वापर करुन, बारकाईने लक्ष दिल्याने चांगल्या पद्धतीने केशर आंब्याचे उत्पन्न मिळत आहे. मागील वर्षी ३० ते ३५ टन आंबा निघाला, यंदा ही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असून, यंदा एकरी ५ टन या प्रमाणे एकूण ४० ते ४५ टन उत्पन्न अपेक्षित आहे. द्राक्ष शेतीच्या तुलनेत आंबा शेती ही निश्चितच फायदेशीर आहे. योग्य काळजी, कमी मनुष्यबळ आणि कमी यंत्रणेचा वापर करुन, नोकरी करत केशर आंब्याची शेती करुन भरघोस फायदा घेता येऊ शकतो, फक्त यासाठी मनापासून आवड, भरपूर परीश्रम घेण्याची तयारी आणि योग्य ते नियोजन याची गरज आहे. शेतकऱ्यांनी मनात आणले तर नंदनवन ही फुलवू शकतात हे संतोष, समाधान, सज्जन वाघमोडे या तिघा बंधुंनी दाखवून दिले. 
 
या बागेतील वैशिष्ट्यपूर्ण केशर आंबा हा केवळ भारतातील आंबा प्रेमींना तर विदेशातील ग्राहकांना देखील भुरळ घालत आहे. याचा गोडवा हा सातासमुद्रापलीकडे गेला असून, संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे, सज्जन वाघमोडे हे तिघे भाऊ आता प्रेरणा स्थान होत आहेत. सोलापूरच्या फळबाग लागवडीच्या प्रगतीशील वाटचालीत आंबा लागवडीने विशेषतः कुरुलचे शेतकरी असलेल्या वाघमोडे बंधुंच्या  केशर आंबा बागेने अत्यंत लक्षणीय योगदान दिले.
 

Related Articles