राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे शिंदे सेनेत प्रवेश करणार !   

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. माढ्यातील नेते संजय कोकाटे हे शरद पवारांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तशा हालचालीनाही कोकाटेंकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात माढ्याचे गणित बदलताना दिसेल. माढा मतदार संघात लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये शरद पवारांनी महायुतीला धोबीपछाड केले होते. यावेळी माढा मतदारसंघातील बहुतांश येथे शरद पवारांकडे आकर्षित झाले होते. मात्र यामधील शरद पवारांच्या पक्षाचे जुने सहकारी असणारे संजय कोकाटे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत संजय कोकाटे प्रवेश करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. याबाबत कोकाटे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतल्याचे समजते. त्यामुळे माढ्यामध्ये आता महायुतीला महाविकास आघाडीच्या विरोधातील एक नवा चेहरा मिळणार आहे. संजय कोकाटे यांनी यापूर्वी माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.  ७० हजार मतांचा वर्ग कोकाटे यांच्या पाठीमागे आहे.त्यामुळे कोकाटे यांची माढा मतदारसंघात असणारी ताकद देखील मोठी समजली जाते. परिणामी पवारांची साथ सोडत संजय कोकाटे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जात असल्याने माढा मतदार संघाचे शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल असे तर्क काढले जात आहेत.
 

Related Articles