सोलापूर एनटीपीसीच्या वीजनिर्मितीत ८९१ मिलियन युनिटची घट   

कार्यकारी संचालक बंडोपाध्याय यांची माहिती  

सोलापूर : सन २०२४-२५ या वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत सोलापूर एनटीपीसीने वीजनिर्मिती केंद्रातून ६२०९ मिलियन युनिट्सची वीजनिर्मिती केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेने यात ८९१ मिलियन युनिटची घट झाली. २०२३-२४ मध्ये ७१०० मिलियन युनिट वीजनिर्मिती झाली होती. ती आतापर्यंतची सर्वाधिक होती. यंदा आर्थिक वर्षाच्या शेवटी ६८०० मिलियन युनिट वीज उत्पादन अपेक्षित असल्याचे एनटीपीसीचे कार्यकारी संचालक तपनकुमार बंडोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
सोलापूर एनटीपीसी ही संपूर्ण भारतातील सात राज्यातील विजेची गरज पूर्ण करत असून, महाराष्ट्राला सर्वाधिक वीजपुरवठा केला जातो. हे केंद्र 2660 मेगावॉट (1320 मेगावॉट) क्षमतेसह कार्यरत आहे. उष्णताजन्य वीजनिर्मितीबरोबरच, एनटीपीसी सोलापूर आपल्या अक्षय ऊर्जा उत्पादनात वाढ करत असून, 23 मेगावॉट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी करीत आहे. पर्यावरणीय जबाबदारीच्या दिशेने पाऊल टाकत, एनटीपीसी सोलापूर फ्लुअल गॅस डीसल्फरायझेशन (एफजीडी) तंत्रज्ञानाचा अवलंब करून वायू प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहे. तसेच, राख पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जैव इंधनाचा उपयोग करून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
 
एनटीपीसी सोलापूर सामाजिक विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय असून, स्थानिक समुदायासाठी विविध उपक्रम राबवत आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिलांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, तसेच स्वयंसहाय्यता गटांसाठी वस्त्रनिर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गर्ल एम्पॉवरमेंट मिशन (जीईएम) कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 40 मुलींना शिक्षण, स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांना केएलई शाळेमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. हा उपक्रम 2019 पासून सतत राबवला जात असून, भविष्यातही सुरू राहणार असल्याचे बंडोपाध्याय यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेस महाव्यवस्थापक बिपुलकुमार मुखोपाध्याय, नवीनकुमार अरोरा, मनोरंजन सारंगी आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

एनटीपीसी परिसरात ५५ हजार वृक्ष लागवड ! 

एनटीपीसी प्रकल्पाच्यावतीने परिसरात आतापर्यंत ५५ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून यापुढेही ८०० वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणामुळे या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. पाणी पातळीही वाढली असल्याचे यावेळी कार्यकारी संचालक तपनकुमार बंडोपाध्याय यांनी सांगितले.
 

Related Articles