पहिल्याच दिवशी विठ्ठलाची नित्य व चंदन उटी पूजेची नोंदणी पूर्ण !   

मंदिर समितीस मिळणार ७५ लाखांचे उत्पन्न

सोलापूर : भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विविध पूजेसाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्याच्या पहिल्या दिवशीच नोंदणी पूर्ण झाली. १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यांसाठी सदर पूजांची नोंदणी घेण्यात आली होती. यामधून मंदिर समितीस ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
 
श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चना पूजा, चंदन उटी पूजा आदी विविध पध्दतीच्या पूजा भाविकांच्या हस्ते केल्या जातात. पूर्वी या पूजा भाविक स्वतः श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यालयात हजर राहून नोंद करीत असत. मात्र, यामुळे परगावच्या तसेच परराज्यातील भाविकांना पूजेची संधी मिळत नव्हती. यासाठी मंदिर समितीने गेल्या काही वर्षांपासून सदर पूजांची नोंदणी ऑनलाइन पध्दतीने सुरू केली.
 
मंगळवारी सकाळी मंदिर समितीच्या वेबसाइटवर अकरा वाजता या पूजांची नोंदणी सुरू झाली. काही तासातच श्री विठ्ठलाच्या रोज होणार्‍या दोन नित्यपूजा व पाडव्यापासून सुरू होणारी चंदन उटी पूजा पूर्णपणे नोंद झाली. राज्याच्या विविध कानाकोपर्‍यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली आहे. 
 
श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा व चंदन उटी पूजा पूर्ण नोंद झालेल्या आहेत. रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा व चंदन उटी पूजा अनुक्रमे ६२ व १८ तसेच पाद्यपूजा २४० व तुळशी अर्चना पूजा ९० नोंद झालेल्या आहेत. रुक्मिणी मातेच्या पूजा भाविकांना अद्याप मिळू शकतात. यासाठी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाइटवर नोंद करावी, असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले.
 

Related Articles