सोलापुरातील उद्याने आणखी चार दिवसांनी उघडणार   

सोलापूर : बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलावासह विविध ठिकाणचे 'वॉकिंग ट्रॅक' येत्या चार दिवसांत परिस्थितीजन्य निर्णय घेऊन खुले करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजी तलाव परिसर व किल्ला भाग परिसरात सात मार्च रोजी कावळा व बगळा या पक्ष्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठविले होते. त्या पक्ष्यांना बर्ड फ्ल्यू असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

आतापर्यंत १३३ पशुपक्ष्यांचा मृत्यू

सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूमुळे आतापर्यंत १३३ पशुपक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कावळा-११०, घार-६, बगळा-४, कबुतर-१३ अशा पशुपक्ष्यांचा समावेश आहे. बर्ड फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलावासह विविध ठिकाणचे वॉकिंग ट्रॅक दक्षता झोन म्हणून जाहीर करून नागरिकांसाठी बंद केले.

घरगुती पक्ष्यांचा अहवाल नकारात्मक      

अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभागाने विविध परिसरातील १२६ नमुने पक्ष्यांचे तसेच घरगुती पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यामुळे 'बर्ड फ्लू'चे संकट टळल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे. तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणखी चार दिवस किल्ला बाग आणि धर्मवीर संभाजी तलावासह विविध ठिकाणचे 'वॉकिंग ट्रॅक' बंद ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
 

Related Articles