आठ कोटींचे अमली पदार्थ नष्ट   

पुणे पोलिसांची कारवाई; रांजणगावातील भट्टीत विल्हेवाट 

पुणे : पुणे पोलिसांनी वर्षभरात जप्त केलेले ७८८ किलो अमली पदार्थ मंगळवारी नष्ट केले. रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या भट्टीत पोलिसांनी सुमारे ७ कोटी ७६ लाखांचे अमली पदार्थ नष्ट केले. यामध्ये गांजा, कोकेन, चरस, हेरॉईन अशा पदार्थांचा समावेश होता. 
 
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकांनी मागील वर्षी ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी कारवाई केली होती. बाजारभावानुसार, या अमली पदार्थांची किंमत सात कोटी ७६ लाख इतकी आहे. यामध्ये गांजाचा सर्वाधिक समावेश होता. 
 
या अमली पदार्थांचा पुनर्वापर होऊ नये, यासाठी तो रांजणगाव येथील कंपनीच्या भट्टीत जाळून नष्ट करण्यात आला. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रासायनिक प्रयोगशाळेतील अधिकारी यावेळी उपस्थित होते. अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणार्‍यांकडून प्रामुख्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांतून पुणे शहरात गांजाचा चोरटा व्यापार केला जातो. 
पुणे, मुंबईसह इतर शहरांत चोरटा व्यापार करणार्‍यांची टोळी कार्यरत असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या पुढेही चोरटा व्यापार करणार्‍यांविरूध्द कारवाई सुरूच राहील, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. 
 
गांजाच्या खालोखाल मेफेड्रोनचे व्यसन बहुसंख्य तरुण करीत असल्याचे उघडकीस आले आहे. मेफेड्रोनच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. झोपडपट्टीतील काही अल्पवयीन मुले देखील गांजाच्या आहारी जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणार्‍यांंविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मेफेड्रोनची चोरटी आयात मुंबईतून केली जाते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अर्थकेम लॅबोरेटरीवर पुणे पोलिसांनी छापा घालत तीन हजार ६७४ कोटींचे मेफेड्रोन जप्त केले होते. ही कारवाई पोलिसांनी केली असल्याने मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पुण्यात करण्यात यावी, असे पत्र पुणे पोलिसांनी एनसीबीला नुकतेच दिले आहे. एप्रिल महिन्यात मेफेड्रोन नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

Related Articles