व्याप्त काश्मीर तातडीने मोकळे करा   

संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला फटकारले

संयुक्त राष्ट्र : गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानने व्याप्त काश्मीर जबरदस्तीने बळकावले आहे. तो भूभाग तातडीने मोकळा करा, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात फटकारले आहे. 
 
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत शांतता मोहिमांची व्याप्ती वाढवावी, या विषयावर खुली चर्चा झाली. त्या चर्चेत भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी राजदूत पर्वतानेनी हरिष यांनी भाग घेतला. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न वारंवार आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला हरिष यांनी सडेतोड उत्तर दिले. 
 
हरिष म्हणाले, जम्मू आणि काश्मीर भारताचा भूभाग आहे. पाकिस्तानने व्याप्त काश्मीरचा भूभाग जबरदस्तीने बळकावला आहे. त्यामुळे तो त्याने तातडीने मोकळा करावा. संयुक्त राष्ट्रातील खुल्या चर्चेत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उकरून काढून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हरिष यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानी प्रतिनिधी जम्मू आणि काश्मीरचा राग अकारण आळवत आहेत. पण, तसे करुन ते वस्तुस्थिती बदलू शकणार नाहीत. कारण व्याप्त काश्मीर भारताचा भूभाग आहे. ते जबरदस्तीने पाकिस्तानने बळकावले आहे. पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया निरंतर सुरू आहेत. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करुन परिषदेचे लक्ष विचालित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करु नये, असा इशारा त्यांनी दिला. आतापर्यंत भारताने अधिक कठोर उत्तर देणे टाळले होते. 

कलम ३७० हटविल्यामुळे मिरच्या झोंबल्या

भारताने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरला दिलेला  विशेष दर्जा देणारे घटनेचे ३७० कलम हटविले होते. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश केले. त्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या होत्या. या निर्णयामुळे तो तोंडावर आपटला आहे. दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले असले तरी भारताने नेहमीच पाकिस्तानबरोबर संबंध चांगले व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 
 

Related Articles