दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार   

दंतेवाडा : छत्तीसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापैकी, एका नक्षलवाद्याच्या डोक्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. मागील ८४ दिवसांत सुरक्षा दलाने १०० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.  देश ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलमुक्त होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. 
 
दंतेवाडा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात काल सकाळी आठच्या सुमारास ही चकमक उडाली. सुरक्षा दलाचे पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाले. या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली याचा समावेश आहे. त्याच्या नावावर २५ लाखांचे बक्षीस होते. तो तेलंगणातील वरंगळचा रहिवासी होता. अन्य दोन नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.  असे पोलिस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितले.
 
गीदाम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि अन्य पथकाने ही मोहीम हाती घेतली होती. चकमकीनंतर घटनास्थळावर तीन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यासोबतच, एक इसांस रायफल, एक ३०३ रायफल, स्फोटक साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तू जप्त करण्यात आले, असेही राय यांनी सांगितले.घटनास्थळावरुन शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या भागात अद्याप शोध मोहीम सुरू आहे, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.मागील आठवड्यात २० मार्च रोजी विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत ३० नक्षलवादी ठार झाले होते.
 

Related Articles