जनसंवाद सभेमुळे नागरिक व प्रशासनातील संवाद वाढेल   

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचे प्रतिपादन

पिंपरी, : ’पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत आहे.  शहरातील नागरिक व प्रशासन यांच्यातील सुसंवाद वृद्धिगत होण्यासाठी या जनसंवाद सभा उपयुक्त ठरत आहेत,’ असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ’ग’ क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी  जनसंवाद सभा अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे उप आयुक्त तथा जनसंवाद समन्वयक मनोज लोणकर, ग क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अभियंता नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता झहिरा मोमीन  उपस्थित होते. 
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ८ क्षेत्रीय कार्यालयात देखील जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अ,ब, क, ड, इ, फ, ह, क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे १४, १२, ४, १५, ५, १२, १९ तक्रारी नागरिकांनी सादर केल्या होत्या. तर ’ग’ क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या या जनसंवाद सभेत नागरिकांनी १४ तक्रारी मांडल्या.जांभळे पाटील यांनी सर्व तक्रारी ऐकून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या कामांची अधिकार्‍यांकडून माहिती देखील घेतली. 
 
शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा घेतला आढावा
 
नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार  महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. यामध्ये  महानगरपालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, पालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करणे, त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे, अशा  बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देखील अतिरिक्त आयुक्त  जांभळे पाटील यांनी ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बैठक व्यवस्था, प्रत्येक विभागाच्या नावाच्या पाट्या आदी कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना जांभळे पाटील यांनी  दिल्या. 

Related Articles