बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात निलंबित   

मुंबई, (प्रतिनिधी) : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर कोरोना काळातील अनियमितताबाबत ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून तीन महिन्यांत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा  आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात डॉ. अशोक थोरात यांचे नाव चर्चेत आले होते. देशमुख यांचा शिवविच्छेदनाचा अहवाल थोरात यांनी दिला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 
 
काल विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत म्हणाल्या की, बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधीचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली. यात ते दोषी सापडले होते. त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. मात्र, नंतर त्यांनी काय केले हे माहीत नाही. पण, त्यानंतर परत जिथे भ्रष्टाचार झाला तिथे  बीडमध्ये त्यांची सिव्हिल सर्जन म्हणून बदली करण्यात आली. हे बरोबर आहे का? जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्यांना पुन्हा इकडे परत कसे आणले गेले? या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्यांचे तुम्ही निलंबन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
 
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. त्यामुळे अशोक थोरात यांना तत्काळ निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. यात जे-जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आबिटकर यांनी केली.
 

Related Articles