सागरी महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार   

सरकारचे विधानपरिषदेत आश्वासन

विजय चव्हाण

मुंबई : कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ५२३ किलोमीटर लांबीचा रेवस ते रेड्डी हा चार पदरी सागरी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने मंत्री दादा भुसे यांनी दिले.
 
भुसे पुढे म्हणाले की, हा महामार्ग ३० वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. काही ठिकाणी तो साडेपाच मीटर आहे, तर काही ठिकाणी तो ७ मीटर  आहे. आता तो चार मार्गिकांचा राहणार आहे. हा रस्ता आता पूर्णतः नवीन होणार आहे. त्यामुळे त्याच्या खर्चात वाढ झाली आहे, असे म्हणणे योग्य नाही.  ५२३ किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी २६,४६३ कोटी खर्च येणार आहे. हा रस्ता दोन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात नऊ पूल प्रस्तावित असून त्यासाठी ९,१०५ कोटी खर्च येणार आहे. रेवस, करंजा, रेवदंडा, आगरदांडा, बाणकोट, केळशी,  जयगड, काळबादेवी, कुणकेश्वर या नऊ ठिकाणी हे पूल होणार आहेत. या नऊ पुलांपैकी पाच पुलांची वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. दोन पुलांचे कॉण्ट्रॅक्ट दिले आहे. दाभोळ आणि काळबादेवी पुलांसदर्भात काही तांत्रिक बाबी आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भुसे यांनी स्पष्ट केले.दुसर्‍या टप्प्यात रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यासाठी १७,३५७ कोटी खर्च येणार आहे.  
 
रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.  साधारणपणे रायगड जिल्ह्यातील २६, रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ आणि सिंधुदुर्गातील ३१ पर्यटन स्थळे या रस्त्याशी जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याचाही अभ्यास करण्यात येत आहे. सर्व बाजूंचे निराकरण करून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मदतीने येत्या तीन वर्षांत हा रस्ता पूर्ण करण्यात येईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

सागरी महामार्गाची वैशिष्ट्ये

सागरी महामार्गाची लांबी ५२३ किलोमीटर 
सागरी महामार्गासाठी येणारा खर्च  २६,४६३ कोटी 
सागरी महामार्गाचे एकूण टप्पे २ 
पहिल्या टप्पात होणार नऊ पूल
पुलांसाठी खर्च ९,१०५ कोटी
दुसर्‍या टप्प्यात होणार 

रस्त्यांची कामे

रस्त्यांसाठी येणारा खर्च १७,३५७ कोटी
पर्यटन स्थळे संलग्न करणार

जिल्हावार पर्यटनस्थळे

रायगड २६
रत्नागिरी ३६
 

Related Articles