लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचा खर्च महापालिकेच्या माथी   

पुणे : पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी लाभार्थी महिलांची ने-आण करण्यासह त्यांचा चहा, पाणी, नाष्टा व भोजन यांची व्यवस्थेच्या खर्चाचे बील महापालिकेच्या माथी मारण्यात आले आहे. या व्यवस्थेसाठी एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेल्या एकूण ५२ लाख ५२ हजार २४० रूपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, यामध्ये १५ क्षेत्रीय कार्यालयांपैकी १४ क्षेत्रिय कार्यालयांचा एक ते दोन लाखांच्या दरम्यान खर्च दाखवला असताना औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय या एकाच क्षेत्रिय कार्यालयाचा तब्बल २७ लाख ६८ हजार २८० रूपये खर्च झाल्यामुळे यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुण्यात १७ ऑगस्ट २०२४ रोजी शुभारंभ कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे पार पडला होता. या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या कार्यक्रमास लाभार्थी महिला गेल्या होत्या की महापालिकेच्या कंत्राटी आणि कायमस्वरूपी सफाई कामगार असलेल्या महिलांना घेऊन जाण्यात आले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र, या कार्यक्रमासाठी खर्चाचे बील पालिकेवर थोपवले आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीत महापालिकेकडे या कार्यक्रमाचे आयोजन सोपविण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमाच्या ५२ लाख ५२ हजार २४० रूपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
 
निवडणुकांमुळे प्रस्तावाला उशीर
 
राज्यात विधानसभा निवडणुकांचा लागू झाल्यामुळे या कार्यक्रमाच्या बीलाच्या प्रस्तावाला वेळ लागला. तसेच, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचेकडून जानेवारी २०२५ मध्ये प्रस्ताव प्राप्त झाला. या विलंबामुळे या कार्यक्रमाच्या बीलाचा प्रस्ताव उशीरा सादर केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
औंध-बाणेर कार्यालयाचा २७ लाख ६८ हजारांचा खर्च
 
महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयामार्फत  बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथे लाभार्थी महिलांची ने आण करण्यासह त्यांचा चहा, पाणी, नाष्टा व भोजन यांची व्यवस्था ठेकेदारामार्फत करण्यात आली. १५ पैकी १४ क्षेत्रिय कार्यालयांचा खर्च १ ते २ लाखांदरम्यान आहे. मात्र, केवळ औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचा तब्बल २७ लाख ६८ हजार २८० रूपये खर्च झाल्यामुळे यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, पालिकेने जास्तीच्या खर्चाला हा कार्यक्रम याच क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येत असल्याने त्यांच्याकडून कार्यक्रमाच्या ठिकाणी अधिकारी वर्ग, उपस्थित कर्मचारी, पीएमपीएमएल बसचे कर्मचारी यांना अल्पोपहार, पिण्याचे पाणी तसेच लाभार्थी महिला यांना पाण्याची व्यवस्था केल्याने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचा खर्च जास्त दिसत असल्याचे पालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे.

Related Articles