आयसीसीसी, पीसीएस प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाईचा पालिकेचा प्रयत्न   

पुणे : इंटीग्रेटेड कंमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आणि पुणे सिटी सर्व्हेलन्स (पीसीएस) या दोन्ही प्रकल्पांसाठी कमीत कमी रस्ते खोदाई करावी लागेल, यादृष्टीने महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहे. या दोन्ही योजनांसाठी साधारपणे २३० किलोमीटर अंतर इतकी एकत्रित खोदाई केली जाईल. तसेच पदपथ, डिव्हायर (रस्ता दुभाजक) या ठिकाणी केबल टाकण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्ते खोदाई कमी होईल असा दावा प्रशासनाने केला आहे.
महाप्रीत या संस्थेमार्फत आयसीसीसी प्रकल्पासाठी पुणे शहरातील पाचशे किलोमीटर डाटा केबल टाकण्यात येणार आहे. महापालिकेने केलेल्या करारानुसार खोदाई केलेले रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी ही महाप्रीत या संस्थेवरच आहे, त्यामुळे महापालिकेला पैसा खर्च करावा लागणार नाही, असा दावा अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केला.
 
अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी मंगळवारी पुणे पोलिस आणि महाप्रीतच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते. या बैठकीत खोदाईच्या संदर्भात चर्चा झाली. त्याविषयी अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज यांनी माहीती दिली. ते म्हणाले, ‘‘ या दोन्ही प्रकल्पांसाठी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाणार आहे. यामध्ये २३० किलोमीटर अंतरात वेगवेगळी खोदाई करावी लागणार नाही. 
तेथे एकत्रितच या दोन्ही प्रकल्पाच्या केबल टाकल्या जाणार आहेत. तसेच पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून आदर्श रस्त्यांची ‘मिशन १७’ हा दुसरा टप्प्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये साधारणपणे ८० किमी रस्त्यांची दुरुस्ती होईल. ही दुरुस्ती करण्यापुर्वी या रस्त्यांवर केबल टाकुन घेतल्या जातील. तसेच या दोन्ही प्रकल्पासाठी काही भागांत पदपथ, दुभाजकाच्या ठिकाणी केबल टाकण्याचे नियोजन आहे. हे अंतर किती असेल याची माहिती महाप्रीत आणि पुणे पोलिसांकडून मागविली आहे. त्यामुळे रस्त्यांची खोदाई कमी प्रमाणात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.
 
महाप्रीत बरोबर झालेल्या करारानुसार तेच खोदाईनंतर रस्ते दुरुस्त करून देणार आहे, त्यामुळे त्यांना शुल्क माफ करण्याचा विषय येत नाही. महापालिकेचे यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही. मात्र, खोदाईनंतर केल्या जाणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या दर्जाविषयी काळजी घ्यावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले. या दोन्ही प्रकल्पासाठी संयुक्तपणे केल्या जाणार्‍या खोदाईशिवाय इतर भागात कराव्या लागणार्‍या खोदाईनंतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या निधीची मागणी राज्य सरकारकडे केली जाईल, असेही अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नमूद केले.
 
रस्ते कमीत कमी खोदावे लागावे यासाठी मशिने रस्ते कट करून केबल टाकण्यात यावी, अशी सुचना संबंधितांना केली आहे. त्याचप्रमाणे रस्ते न खोदता टनेल पद्धतीने केबल टाकता येतील का ? याचा विचार करावा अशा सुचना केल्या आहेत.  
 
- पृथ्वीराज बी.पी अतिरिक्त महापालिका आयुक्त

Related Articles