साखरेच्या गाठी बनविण्यासाठी व्यावसायिकांची लगबग   

भीमाशंकर, (वार्ताहर) : मराठी महिन्याची सुरुवात यावर्षी ३० मार्च रोजी म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या सणाने होते. पहिला दिवस आपण नववर्ष आणि गुढी उभारून साजरा करतो. विशेष म्हणजे गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठीचे विशेष महत्त्व असल्याने साखरेच्या गाठी बनविण्यासाठी व्यावसायिकांची लगबग अंतिम टप्प्यात आहे. 
 
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा ठेवून, कडुनिंबाची डहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. साखरेच्या गाठी व कडुनिंबाच्या पानाशिवाय गुढी उभारली जाऊच शकत नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात साखरगाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. आपण बाजारांतून आकर्षक नक्षीकाम, वेगवेगळे रंग, रेखीव आकार, वेगवेगळी चित्रे असलेल्या गाठीची खरेदी करतो. 
 
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सध्या गोड साखरेच्या गाठी बनविण्यासाठी महिनाभर अगोदर लगबग सुरू झाली आहे. साखरेच्या वेगवेगळया रंगीत गाठी बनविण्यासाठी यात फूड कलर घालून साखरेची गाठी बनवली जाते. यावर्षी साखर गाठी बनविण्यासाठी बहुतेक वस्तूचे दर वाढलेले आहे. तसेच कारागीर मजुरीही वाढल्याने गाठीच्या किमतीत २५ ते ३० टक्के वाढ होणार असल्याचे, व्यावसायिक कांतीलाल परदेशी, बिहारी परदेशी यांनी सांगितले. 
 

Related Articles