सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषींवर कारवाई होणार?   

मुख्यमंत्र्यांकडून संकेत

पुणे : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली होती. मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना या प्रकरणी पोलिस अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे सुनील माने यांनी स्वागत केले आहे.
 
याबाबत अधिक बोलताना सुनील माने म्हणाले, परभणी येथे असलेल्या संविधान प्रतिकृतीचा काही दिवसांपूर्वी एका समाजकंटकाने तोडफोड करून अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५० हून अधिक लोकांवर मुख्य आरोपी म्हणून तर ३०० ते ४०० जणांवर सह आरोपी म्हणून गुन्हा नोंद करून अनेक तरुण, महिला यांना अटक केली होती. पोलिसांनी वस्तीत कोंबिंग ऑपरेशनसुद्धा केले होते. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे त्याच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाले होते. मी स्वत: सुद्धा परभणी येथे जाऊन याबाबत स्थानिकांशी चर्चा करून माहिती घेतली होती. गावकर्‍यांकडून घेतलेल्या माहितीवरून सुद्धा हे स्पष्ट होत होते.
 
पोलिस मात्र सोमनाथचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभागृहात हेच सांगितले होते. याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आयोगाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. नुकताच न्यायदंडाधिकारी यांनी हा चौकशी अहवाल आयोगाला सादर केला. त्यात सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने पुन्हा मी दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
 
याबाबत काल सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी, अहवालात पोलिसांच्या  मारहाणीत मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यास नक्की दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करत असल्याचे सांगत याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी माने यांनी केली आहे.

Related Articles