डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार   

गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांची माहिती 

पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी नुकतीच करण्यात आली आहे. याचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच त्याच्याविरोधात आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपास अधिकार्‍यांनी दिली.  
 
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी आरोपी गाडेने तरुणीवर अत्याचार केला होता. त्यानंतर गाडे फरारी झाल्यानंतर त्याला ७२ तासांच्या आत पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. सध्या गाडे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या घटनेला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला आहे. पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. तसेच, ज्या शिवशाही बसमध्ये गाडेने तरुणीवर अत्याचार केला होता. त्या बसचा चालक आणि वाहक यांचे देखील जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
 
गाडेच्या मोबाईलचा शोध सुरू 
 
या घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. या प्रकरणात मोबाईल सर्वांत मोठा पुरावा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या महिन्याभरानंतरही पोलिसां-कडून मोबाईलचा शोध घेतला जात आहे. 

Related Articles