कलाग्राम प्रकल्प चालवण्यासाठी संस्थेचा शोध   

उद्घाटनानंतरही प्रकल्प बंदच
 
पुणे : सुमारे बावीस कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या कलाग्राम प्रकल्पाकरीता महापालिका संस्थेचा शोध घेत आहे. यामुळे उद्घाटनानंतर पाच महिने उलटून गेले तरी या प्रकल्पाचा नागरीकांना उपयोग करुन घेता येत नाही.
 
पुणेकरांना देशभरातील विविध राज्यांच्या लोककला व ग्रामीण कलासंस्कृती एकाच छताखाली पाहता यावी, तसेच हौशी व नवोदीत कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महापालिकेने तब्बल २२ कोटी रुपये खर्च करुन सिंहगड रोड वरील पु. लं. देशपांडे उद्यानात कलाग्राम प्रकल्प साकारला आहे. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. दरम्यान, उद्घाटनाच्या पाच महिन्यानंतरही अद्याप प्रकल्प सुरु झाला नाही. प्रकल्पाच्या मुळ उद्देशाला अनुसरुन हस्तकला व लोककलांना प्रोत्साहन देणारी संस्था मनपा प्रशासनाला मिळालेली नाही. यामुळे उद्घाटनानंतरही पाच महिन्यांपासून कलाग्राम प्रकल्प धूळखात पडून आहे.
 
महापालिकेने जपानी शैली व मुगल शैलीचे तब्बल २७ एकर जागेवर पु. लं. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. याठिकाणी विविध राज्यांच्या लोककला व ग्रामीण कलासंस्कृतीस प्रोत्साहन देण्यासाठी साडेतीन एकर जागेवर कलाग्राम प्रकल्प साकारण्यात आले. या कामाला स्थायी समितीने २०१८ मध्ये मंजुरी दिली होती. कासवगतीने काम सुरु असलेल्या या प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रींचे काऊंटर, दोन लायब्ररी, विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे १२ स्टॉल, कार्यशाळांसाठी दोन खुले व्यासपीठ, बांबू व दगडांपासून तयार होणार्‍या वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहण्याची व्यवस्था, अ‍ॅम्फीथिएटर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
 
कलाग्राम प्रकल्प चालविण्यासाठी लवकरच संस्था नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाईल. प्रकल्पाच्या उद्देशानुसार काम करण्यासाठी हस्तकलांना प्रोत्साहन देणार्‍या संस्थेचा शोध सुरु आहे. याबाबत लवकरच पुढील कार्यवाही केली जाईल.
 
पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Related Articles