हार्दिक शुभेच्छा... पण त्याचं काय?   

सुखी संसाराची गुरुकिल्ली देणारा चित्रपट
 
रुपेरी पडदा : कल्पना खरे 
 
समाजात अद्यापही फारसा मोकळेपणाने न बोलला जाणारा विषय म्हणजे लैंगिक सुसंगती. याच नाजूक विषयावर भाष्य करणारा आणि विचार करायला लावणारा चित्रपट सध्या प्रदर्शित होत आहे ‘‘हार्दिक शुभेच्छा.... पण त्याचं काय?’’
 
माधव जोशी (पुष्कर जोग) हा एक लग्नाचे वय उलटून चाललेला मुलगा. स्वभावाने काहीसा बुजरा, कमी उंची, डोक्यावर चाई/टक्कल पडलेले, त्यामुळे एकही मैत्रीण नाही याची मनोमन खंत बाळगणारा. एका ट्रॅव्हल कंपनीत उत्तम नोकरी. वडील (अभिजीत चव्हाण) आणि आई (विशाखा सुभेदार) यांना मात्र त्याच्या लग्नाची घाई झालेली असते. निरनिराळी ‘स्थळे’ दाखवूनही माधवकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ते नाराज होत असतात. अचानक त्याला एका पार्टीत राधिका (हेमल इंगळे) भेटते आणि त्याच्या जीवनाला एकदम कलाटणी मिळते. राधिका तिची आई (किशोरी अंबिये) बरोबर राहात असते. दोघांची मने जुळतात, सर्वसंमतीने लग्नही होते. वर वर पाहता सर्व छान दिसते; पण...
 
राधिकाच्या गतजीवनातील काही घटना का त्रासदायक ठरतात? त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते कां? या गोष्टी पडद्यावर पाहणेच योग्य ठरेल.
चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पुष्कर जोगने केले असून या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही प्रेक्षकांना विचार करायला भाग पडतो. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अ‍ॅमस्टरडॅम व पॅरिसच्या नयनरम्य परिसरात चित्रीकरण झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. एका नवविवाहित दांपत्याची ही कथा नातेसंबंधातील एका महत्त्वाच्या पैलूशी जोडून ठेवते.
 
पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, अभिजीत चव्हाण, विशाखा सुभेदार सर्वांच्याच भूमिका, अभिनय सहजसुंदर आहेत. अनुष्का सरकाटेही आपल्या छोट्याशा भूमिकेत लक्षात राहते. एक रॅप साँग ‘डोक्याला शॉट’ आहे हे मात्र तितकेसे पकड घेत नाही. पॅरीस, दुबई, अ‍ॅमस्टरडॅम या ठिकाणांची सिनेमॅटोग्राफी अफलातून आहे. लग्न म्हटले की, शुभेच्छांचा महापूर येतो; पण काही महत्त्वाच्या गोष्टी दुर्लक्षित राहतात. हे टाळण्यासाठी हा चित्रपट अवश्य पाहा.
 
लेखक दिग्दर्शक : पुष्कर जोग
कलाकार : पुष्कर जोग, हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, अभिजीत चव्हाण, विशाखा सुभेदार, विजय पाटकर, अनुष्का सरकाटे, किशोरी अंबिये.

Related Articles