पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला भीषण आग   

पिंपरी : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर ३० प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन भीषण आग लागली. ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने बस मधील ३० प्रवासी सुखरूप आहेत. 
 
याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी खासगी प्रवासी बस चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदारला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास किलोमीटर ७८ येथे खासगी प्रवासी बसचा अपघात झाला. कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसवरील चालक वर्षिकेतने वाहनाला ओव्हरटेक करत असताना बसवरील ताबा सुटला आणि महामार्गावरील संरक्षण पत्र्याला तोडून बस खाली गेली. बसमधील ३० प्रवासी जखमी झाले नाहीत. ते खाली उतरल्यानंतर बसला भीषण आग लागली.
 
सुदैवाने ३० प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. घटनास्थळी वडगाव अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे अग्निशमन दल, एमएसआरडीसीचे जवान दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीत बस जळून खाक झाली आहे. हलगर्जीपणा करणार्‍या खासगी बस चालकाला शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Articles