विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड निश्चित   

पिंपरी : विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार)  आमदार अण्णा बनसोडे यांचा एकच अर्ज आल्याने  त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. त्याबरोबरच पिंपरी चिंचवडला हा सन्मान पहिल्यांदाच मिळत आहे.
 
विधान परिषदेचे उपसभापतीपद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. तर आता विधानसभेचे उपाध्यक्षपद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले आहे. विधानसभा उपाध्यक्षांची घोषणा होण्याची औपचारिकता आता शिल्लक आहे. बुधवारी सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा दादू बनसोडे यांचा जन्म ४ मे १९६८ साली झाला. त्यांचे शिक्षण बारावी आणि आयटीआय असे झाले आहे. बनसोडे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द खर्‍या अर्थाने १९९७ मध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नगरसेवक पदापासून झाली. त्यानंतर २००२ मध्ये सलग दुसर्‍यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
 
बनसोडे यांची आमदारपदाची ही तिसरी टर्म आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून ते सर्व प्रथम २००९ मध्ये विजयी झाले. त्यानंतर २०१९ आणि २०२४ असे सलग दोन वेळा ते पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे.

Related Articles